ठाणे - शहरात वाहनांची वाढत असलेली संख्या, औद्योगिक कामकाज आणि नव्याने होणाऱ्या बांधकामांमुळे ठाण्यातील हवेच्या प्रदुषणात वाढ होत आहे. धुलीकणांचे प्रमाण देखील वाढले असून शहरातील विविध चौकात देखील कार्बन मोनॉक्साईड व बेन्झिनचे प्रमाण काही जास्त प्रमाणात आढळले आहे. त्यामुळे आता नव्या वर्षाची भेट म्हणून का होईना आता पालिका शहरातील तब्बल १०० किमीचे रस्ते चकाचक धुवणार आहे. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असून त्यानुसार आता शहरातील अशा रस्त्यांचा सर्व्हे सुरु होणार आहे. दहा दिवसा आड अशा पध्दतीने प्रत्येक रस्ता धुतला जाणार असून यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले २० दशलक्ष लीटर पाणी वापरले जाणार आहे.ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षीच्या तुलेत यंदा वाहनांच्या संख्येत १ लाख ०५ हजार ५३४ एवढी वाढ झाली आहे. त्यातही शहरातील दुचांकींची संख्या ही १० लाख ७६ हजार ५६४ एवढी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ ७२ हजार ७७३ एवढी झाली आहे. तर शहरात आजच्या घडीला एकूण १९ लाख २७ हजार १५५ वाहने असल्याचे पर्यावरण अहवालात नमुद करण्यात आले आहे. महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात शहरातील १६ चौकांचे सर्व्हेक्षण केले असता, त्याठिकाणी सल्फरडाय आॅक्साइड (एसओटू), नायट्रोजन आॅक्साइडचे प्रमाण मर्यादेशपेक्षा कमी आढळले आहे. परंतु हवेतील धुळीकणांचे प्रमाण हे मानकापेक्षा मर्यादेपक्षा जास्त आढळून आले आहे. महापालिकेने केलल्या शहरातील काही परिसरात सल्फरडाय आॅक्साइड आणि नायट्रोजन आॅक्साइडचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा कमी आहे. तर धुळीकणांचे प्रमाण अधिक आढळले आहे. तर शहरातील मुख्य १६ चौकांच्या ठिकाणी हवेतील धुळीकणांचे प्रमाण हे मानकापेक्षा जास्त आढळले आहे.दरम्यान, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत यावर उपाय योजना करण्याचे आदेश दिले असून अशा प्रकारचे रस्ते धुवण्याच्या सुचना केल्या आहेत. ज्यामुळे धुलीकणांचे प्रमाण कमी होऊन ठाणेकरांना चकाचक रस्त्यांवरुन प्रवास करणे सोपे होणार आहे. त्यानुसार नगर अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये दोन उपअभियंते आणि इतर अधिकारी असणार आहेत.त्यानुसार ही टीम आता येत्या १० दिवसात शहरातील १०० किमी रस्त्यांचा सर्व्हे करणार असून, या रस्त्यांचा मॅप तयार केला जाणार आहे. धुळीचे प्रमाण साधारणपणे किती आहे, याचा अभ्यास केला जाणार आहे, त्यानुसार स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून रात्री १२ ते पहाटे चार वाजेपर्यंत हे रस्ते धुतले जाणार आहेत. यासाठी कोपरी येथील मलनिसारण प्रक्रिया केंद्रातील २० दशलक्ष लीटर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जाणार आहे. पालिका यासाठी १० टँकर उपलब्ध करणार आहे. प्रत्येक १० दिवसा आड अशा पध्दतीने या रस्त्यांची धुलाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यानुसार पुढील २० दिवसात धुलाईचे हे काम सुरु होणार असून नव्या वर्षात ठाणेकरांना प्रदुषणमुक्त आणि चकाचक रस्त्यांवरुन प्रवास करता येणार आहे.
धुळीचे प्रदुषण रोखण्यासाठी पालिका धुवणार शहरातील १०० किमीचे रस्ते, पुर्नप्रक्रिया केलेले पाणी येणार वापरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 2:54 PM
नव्या वर्षात ठाणेकरांचा प्रवास धुळीच्या प्रदुषणापासून आणि चकाचक धुतलेल्या रस्त्यावरुन होणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासाठी एका समितीची स्थापना केली असून त्यांच्या माध्यमातून शहरातील अशा रस्त्यांचा सर्व्हे सुरु होत आहे.
ठळक मुद्दे१० टँकरचा केला जाणार वापरकोपरीच्या मलनिसारण प्रकल्पातील प्रक्रिया केले पाणी येणार वापरातरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत धुतले जाणार रस्ते