अगोदर खड्ड्यांनी आता खोदकामांनी लावली वाट; वाहनचालकांसमोरचे विघ्न अद्याप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:35 AM2020-01-13T00:35:09+5:302020-01-13T00:35:16+5:30
अपघाताची शक्यता : मलवाहिनीची कामे संथगतीने
डोंबिवली : शहरात खोदकामांचा सिलसिला सुरूच असून ती कामे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. प्रकल्पांची कामे संथगतीने चालू आहेत. परिणामी, महिना उलटूनही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवावे लागत आहेत. विरुद्ध दिशेने वाहतूक चालविली जात असल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. आधीच पावसाळ्यात खड्ड्यांनी वाहनचालक बेजार झाले होते. आता खोदकामांची भर पडली आहे.
शहरातील बहुतांश ठिकाणी अमृत योजनेंतर्गत मलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही कामे सुरू आहेत. परंतु, ही कामे संथगतीने सुरू असल्याचे चित्र ठाकुर्ली परिसरातील ९० फूट रोड आणि रेल्वे समांतर रस्त्यावर पाहायला मिळत आहे. कल्याणहून डोंबिवलीकडे येणाऱ्या समांतर रस्त्यावर महिनाभरापूर्वी मलवाहिनी टाकण्याकरिता खोदकाम करण्यात आले होते. ते काम नुकतेच मार्गी लागले असताना आता पुढील भागातील रस्ता खोदायला घेतला जाणार आहे. म्हसोबा चौकातील कामही बºयाच दिवसांपासून सुरू होते. आता ते ९० फूट रोडच्या दिशेने चालू आहे. ९० फूट रोडवरून खंबाळपाडा रोडकडे येणारा रस्ताही अनेक दिवसांपासून खोदण्यात आला आहे. ठिकठिकाणी केलेल्या खोदकामांमुळे वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. ही कामे संथगतीने सुरू असल्याने ती पूर्ण व्हायला बराच कालावधी लागत आहे. कधी कोणता रस्ता कामासाठी बंद केला जाईल, याचा नेम नसल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असते. ज्याठिकाणी कामे झाली आहेत, त्याठिकाणी डांबरीकरण सुरू करण्यात आल्याने सर्वच ठिकाणी अडथळ्यांची शर्यत पार पाडत वाहनचालकांना मार्गस्थ व्हावे लागत आहे. त्यात विरुद्ध दिशेने वाहने चालवावी लागत असल्याने अपघात होण्याचा धोका कायम आहे. मलवाहिनीची कामे होणे गरजेचे आहे. अर्थात, कामांमध्ये गती असणे आवश्यक असल्याचे मत वाहनचालकांचे आहे.
रस्त्याची पातळी राहिली नाही
पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरही ९० फूट रोडवर खड्ड्यांचा त्रास कायम होता. खड्ड्यांच्या ठिकाणी आता डांबराचे पॅच मारण्यात आले आहेत. यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी पॅचमुळे या रस्त्याची पातळी राहिलेली नाही. उंचसखल झालेल्या रस्त्यावर दुचाकी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.