कल्याण : आधारवाडी कारागृहात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गुरुवारी दुपारी पळालेला कैदी राजेंद्र जाधव याला २४ तासांत जेरबंद करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी यश आले आहे. जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, रिक्षाचोरीच्या गुन्ह्यात तो आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत आहे.
आधारवाडी कारागृहातील कर्मचारी गुरुवारी दुपारी नियमाप्रमाणे कैद्यांकडून साफसफाईचे काम करून घेत होते. एकूण सात कैद्यांनी हे काम केले. त्यानंतर, याच परिसरातील सांस्कृतिक हॉलमध्ये कैद्यांनी जेवण केले. यावेळी जाधव हा नैसर्गिक विधीसाठी जातो, असे सांगत पाठीमागील शौचालयाच्या बाजूने कारागृहाबाहेर पळून गेला. कैदी पसार झाल्याची तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली.दरम्यान, जाधव हा बदलापूर पाइपलाइन रोडवरील कोळेगाव सर्कलजवळील त्याच्या घराजवळ येणार, अशी माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, नितीन मुदगुण यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा लावला होता. तेथे जाधवला पोलिसांचा संशय आल्याने तो पळू लागला. त्यास पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
पुढील महिन्यात होणार होती सुटकाजाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात टिळकनगर आणि महात्मा फुले चौक पोलिसात रिक्षाचोरीचे गुन्हेही दाखल आहेत. रिक्षाचोरीच्या प्रकरणातच त्याला दोन वर्षांची शिक्षा झाली होती. त्याची एका महिन्याने सुटका होणार होती. मात्र, याआधीच त्याने पळ काढला.
कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली असली तरी एकूणच या घटनेमुळे आधारवाडी कारागृहातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.