व्यावसायिक प्रगती साधण्यासाठी योग्य संभाषणकौशल्य व आत्मविश्वास - स्मिता गुमास्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 03:04 PM2020-08-01T15:04:28+5:302020-08-01T15:11:40+5:30
ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त कृतज्ञता केली.
ठाणे : व्यावसायिक प्रतिमा म्हणजे योग्य संभाषणकौशल्य व आत्मविश्वास होय, व्यावसायिक प्रगती साधण्यासाठी या बाबी आवश्यक ठरतात असे मत इमेज कन्सलटंट स्मिता गुमास्ते यांनी व्यक्त केले. आपली व्यावसायिक प्रतिमा अधिक आकर्षक करण्यासाठी आंतर-प्रतिमा व बाह्य-प्रतिमा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात असेही त्या पुढे म्हणाल्या. सतीश प्रधान ज्ञानसाधनामहाविद्यालयाच्याविद्यार्थी समितीच्यावतीने योग्य सामाजिक अंतर राखण्याच्या या काळात 'विविध कलागुणांचे अनुसरण' या उद्देशाने, आयोजित करण्यात आलेल्या *"द क्विंटेट ऑफ आर्टिस्ट्री"*(कलात्मक पंचकडी) वेबिनार प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला माजी विद्यार्थी सपना गोळे, आकाश आंबेरकर आणि सचिन पाटील यांनी महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गुरुवारच्या दुसऱ्या सत्रात "प्रोजेक्ट पर्सनॕलिटी मास्टरी" या कार्यक्रमात इमेज कन्सलटंट गुमास्ते आणि वैष्णवी शूर यांनी 'आपल्या आकर्षक प्रतिमेसह आपली व्यावसायिक उपस्थिती कशी लक्षवेधी करावी' याबाबत सखोल मार्गदर्शन केले. गुमास्ते पुढे म्हणाल्या, स्वतःबद्दलची संवेदना, आत्मसात केलेली जीवनमुल्ये, सकारात्मक वृत्ती व गुणवैशिष्ट्यांबरोबरच आपली देहबोली, शिष्टाचार,आपल्या पद-प्रतिष्ठेला शोभेल अशी वेशभूषा हे घटकही तितकेच महत्त्वाचे ठरतात. नोकरी-व्यवसायात हसरा चेहरा, चेहऱ्यावरील उत्साही भाव आपल्या क्रियाशिलतेला वेगळी उंची प्रदान करून देतात, स्वतःचा स्वाभिमान जपताना नकारात्मकता वाढवणाऱ्या परिस्थितीतही सकारात्मक विचारधारा ठेवल्यास अडचणी चुटकीसरशी सोडवता येतात असे, त्या म्हणाल्या. तर, संभाषणकौशल्याबरोबरच वेशभूषा, शारिरीक स्वछता या बाबीही व्यावसायिक प्रतिमा आकर्षक करण्यासाठी प्रभावी ठरतात. आपल्या पद-प्रतिष्ठेला योग्य न्याय देणाऱ्या विशिष्ट वेशभूषेच्या मदतीने व कमीत कमी उपकरणांच्या साहाय्यानेही आपले व्यक्तिमत्व खुलवता येते असे मत वैष्णवी शूर यांनी व्यक्त केले. शुक्रवारी झालेल्या सत्रात शेफ सुनिता पाटील यांनी 'रोज रसमलाई केक' ही पाककृती सादर केली. या सत्राच्या सुरुवातीला माजी विद्यार्थी आशुतोष वाविसकर, वर्षा येवले, पत्रकार प्रज्ञा म्हात्रे आणि मोहम्मद दोराजीवाला यांनी महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आज जी उल्लेखनीय कामे करू शकलो त्यामध्ये सर्व शिक्षक व महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे, कारण या क्षेत्रासाठी आवश्यक प्रारंभीचे व्यासपीठ मला महाविद्यालयाने अनेक एकांकीका, नाटकांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले, अशी भावना 'माझ्या नवऱ्याची बायको, डॉ. डॉन या मराठी मालिकांसाठी दिग्दर्शकाची भुमिका निभावणाऱ्या आशुतोष वाविसकर यांनी व्यक्त केली. उदात्त उपक्रम साकारताना महाविद्यालयातील शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांइतकाच उत्साह मी अनुभवला, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी मिळालेली शाबासकीची थाप अविस्मरणीय आहे, असे ते म्हणाले. तर, दोहा(कतार) येथील नसीम अल् रबीह वैद्यकीय केंद्रात प्रशिक्षक पदावर कार्यरत असलेल्या मोहम्मद दोराजीवाला यांनी महाविद्यालयात ज्ञानसंपन्न, उत्कृष्ट शिक्षक लाभल्यामुळेच जीवनाला योग्य दिशा मिळाल्याचे प्रतिपादन केले. महाविद्यालयातील शिक्षकांमुळे, विविध कार्यक्रमांमधून उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळे प्रभावी संभाषणकौशल्य शिकलो, त्यामुळेच माझ्या क्षेत्रात आज मी अपेक्षित प्रगती साधू शकलो, असे ते म्हणाले. यावेळी लोकमत मिडीया प्राय. लिमिटेड या संस्थेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत वर्षा येवले यांनीही महाविद्यालयीन स्मृतींना उजाळा दिला. आयुष्याच्या यशस्वी वाटचालीत महाविद्यालयीन संस्कारांचा मोठा वाटा आहे, राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभाग, एकांकीकांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासास दिशा मिळाली, विशे सर, दवणे सर, बागवे सर या दिग्गज व प्रतिभासंपन्न व्यक्तींचा सहवास लाभला, असे त्या म्हणाल्या. तर, महाविद्यालयातील अभ्यासेतर उपक्रमांमुळे नेतृत्वगुण आत्मसात करता आले, अशी भावना लोकमत वृत्तसमुहातील पत्रकार प्रज्ञा म्हात्रे यांनी व्यक्त केली. महाविद्यालयात मिळालेल्या संस्कारांची शिदोरी, जीवनमुल्यांची शिकवण आजही उपयोगी पडत असल्याचे त्या म्हणाल्या. संस्थेचे सचिव कमलेश प्रधान, प्राचार्य चंद्रशेखर मराठे यांनी राबविलेल्या उपक्रमांमुळे महाविद्यालय सकारात्मक प्रगती साधत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. वेदांती गिडे या विद्यार्थिनीने सुत्रसंचालकाची भूमिका निभावली.
या पाचदिवसीय वेबिनारच्या आयोजनात तन्वी ठोसर, युक्ता तिवारी, संकेत मोरे, हृषिकेश कोकाटे, साहिल किलजे, सोनाली पाटील,संजीव चव्हाण, ओंकार पावटेकर, अमरदीप भनौत या विद्यार्थ्यांनी मोलाची भुमिका निभावली आहे.