मालमत्ताकर, पाणीपट्टी भरणा योजनेस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:53 AM2021-02-27T04:53:42+5:302021-02-27T04:53:42+5:30
ठाणे : कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना दिलासा मिळावा, ...
ठाणे : कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी जे निवासी करदाते मालमत्ता व पाणीपट्टीवरील कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील, अशांसाठी थकीत करावर आकारलेल्या शास्तीच्या रकमेवर १०० टक्के सूट देण्याच्या योजनेस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे.
ठामपाने करदात्यांसाठी ही योजना जानेवारी व फेब्रुवारीपर्यंत सुरू ठेवली होती. या काळात अंदाजे ७० हजार करदात्यांनी मालमत्ता कराची ११० कोटीपर्यंतची रक्कम भरली आहे. तर, पाणीपट्टीपोटी तीन महिन्यांत अंदाजे ५० कोटींची रक्कम भरली आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन या योजनेस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कराची थकबाकी असल्यास संपूर्ण थकबाकी, संपूर्ण चालू मागणी आणि सूट नंतरची देय शास्तीची (दंड अथवा व्याज) रक्कम उपरोक्त मुदतीत एकत्रित भरणे अनिवार्य आहे. ज्यांनी कराची संपूर्ण रक्कम शास्तीसह या योजनेपूर्वी जमा केली असेल त्यांना ही सूट देय असणार नाही.
‘डीजी ठाणे’ ॲपद्वारे कर भरल्यास सूट
- ऑनलाइनद्वारे मालमत्ताकर भरण्यासाठी देयके महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत.
- त्याचबरोबर सर्व प्रभाग व उपप्रभागस्तरावील कर संकलन केंद्रे, नागरी सुविधा केंद्रामधील कर संकलन केंद्रे ३१ मार्चपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते सायं. ५ तसेच सार्वजनिक सुटी व सर्व शनिवारी सकाळी १०.३० ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहतील.
- महापालिकेच्या ‘डीजी ठाणे’ ॲपद्वारे कराचा भरणा केल्यास विशेष सूटही मिळू शकेल. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.