अखेर उल्हासनगरातील खचलेल्या डोंगराला संरक्षण भिंत बांधणार; पालिकेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 05:22 PM2021-07-23T17:22:14+5:302021-07-23T17:22:31+5:30
उल्हासनगरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, पावसाने धुमाकूळ घातला. संततधार पावसाने धोबीघाट येथील डोंगर खचून डोंगराच्या किनाऱ्यावरील दोन घरे पडून काही घरांना तडे गेले होते.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : धोबीघाट येथील खचलेल्या डोंगराला सरंक्षण भिंत बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने, डोंगरावर राहणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. संततधार पावसाने डोंगरावरील दोन घरे पडून काही घरांना तडे गेल्याची घटना घडली होती. तसेच गेल्या आठवड्यात महापालिकेने काही घरांना नोटिसा दिल्या होत्या.
उल्हासनगरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, पावसाने धुमाकूळ घातला. संततधार पावसाने धोबीघाट येथील डोंगर खचून डोंगराच्या किनाऱ्यावरील दोन घरे पडून काही घरांना तडे गेले होते. सावधगिरीचा उपाय म्हणून सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी १२ पेक्षा जास्त घरांना नोटिसा देऊन घरे खाली करण्याचे सांगितले. याप्रकारने स्थानिक नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. धोकादायक इमारत व पुराचा तडाखा बसलेल्या नागरिकांना पर्यायी जागा देत असताना, डोंगरावरील नागरिकांना वेगळा न्याय का? असा प्रश्न मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी महापालिकेला करून डोंगरकडेला संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली.
अखेर महापालिकेने संरक्षण भिंत बांधण्यास परवानगी दिल्याची माहिती शेख यांनी दिली. महापालिकेचे शहर अभियंता महेश शितलानी यांनी आयुक्त, विभागाचे उपायुक्त यांच्या आदेशानुसार डोंगरकडेला संरक्षण भिंत बांधण्यास परवानगी दिल्याची माहिती दिली. तर डोंगर कडेवरील नागरिकांनी समाधान व्यक्त करून पर्यायी घरे देण्याची मागणी केली.