‘चुटकीभर गंमत’चे ठाण्यात प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:40 AM2021-07-29T04:40:14+5:302021-07-29T04:40:14+5:30
ठाणे : ग्रंथाली प्रकाशित व डॉ. मृण्मयी भजक लिखित ‘चुटकीभर गंमत’ या पुस्तकाचे आणि ‘अमेरिका खट्टी मीठी’ या पुस्तकाच्या ...
ठाणे : ग्रंथाली प्रकाशित व डॉ. मृण्मयी भजक लिखित ‘चुटकीभर गंमत’ या पुस्तकाचे आणि ‘अमेरिका खट्टी मीठी’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच ठाण्यात झाले. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, ख्यातनाम अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
‘चुटकीभर गंमत’ हे पुस्तक म्हणजे ‘लोकमत’च्या सखी पुरवणीमधील सदराचा लेखसंग्रह आहे. या पुस्तकाचे प्रकाशन म्हात्रे यांच्या हस्ते झाले. ‘चुटकीभर गमतीचे’ गोड फुलपाखरू विशेषतः या कठीण काळामध्ये आपल्याला किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी सांगितले. मोठ्या बोजड साहित्याच्या तुलनेत दोन्ही पुस्तकातील हलके-फुलके लेख हे मनाला प्रफुल्लित करून जातात, असेही ते यावेळी म्हणाले.
तर, मधुरा वेलणकर-साटम यांच्या हस्ते ‘अमेरिका खट्टी मीठी’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. या पुस्तकातील साठ डॉलरचा आत्मविश्वास, रिपेट्रीएशन, अशा काही लेखांचा उल्लेख साटम यांनी आवर्जून केला. आपल्या भाषणात त्यांनी स्वत्व जपणे, मराठी भाषा अशा मुद्द्यांना स्पर्श केला.
‘ग्रंथाली’चे विश्वस्त धनंजय गांगल यांनी दोन्ही पुस्तकांवर प्रकाशक म्हणून अतिशय मुद्देसूद असे भाष्य केले. हर्षदा बोरकर यांच्या अभिवाचनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लतिका भानुशाली यांनी केले. ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि ग्रंथाली कार्यक्रम संचालक धनश्री धारप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दृक्श्राव्य माध्यामातून मुकुंद मराठे, विनय राजवाडे, उमा दीक्षित यांनी त्यांच्या आयुष्यातील ‘गंमत गप्पा’ सांगितल्या. ‘ग्रंथाली’ आणि ‘ऑगस्ट मीडिया ॲण्ड ट्रेनिंग’ या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
डॉ. भजक यांनी सांगितले अनुभव
डॉ. भजक यांनी आपल्या मनोगतात, निवेदिका आणि लेखिका म्हणून त्यांचा प्रवास कसा झाला हे सांगत सर्वांपरी कृतज्ञता व्यक्त केली. ‘चुटकीभर गंमत’ हे सदर ‘लोकमत’च्या सखी पुरवणीत प्रसिद्ध होत असतानाचे आलेले अनुभव त्यांनी सांगितले.
------------