भाईंदर येथील रेल्वे तिकीट घर चोरट्याने फोडले; संगणक, प्रिंटर आदींची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 11:55 AM2018-01-27T11:55:57+5:302018-01-27T11:56:12+5:30
रेल्वेचे भाईंदर पश्चिम येथील तिकीट घर अज्ञात चोरट्याने फोडल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्याच्या हाती रोख लागली नसली तरी त्याने आतील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा आदींची तोडफोड केली आहे.
धीरज परब
मीरारोड - रेल्वेचे भाईंदर पश्चिम येथील तिकीट घर अज्ञात चोरट्याने फोडल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्याच्या हाती रोख लागली नसली तरी त्याने आतील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा आदींची तोडफोड केली आहे. भाईंदर पश्चिमेला बालाजी नगर येथे रेल्वेचे तिकीट व आरक्षण बुकिंग घर आहे. येथे तीन तिकीट खिडक्या आहेत. आज शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास रेल्वे कर्मचारी तिकीट खिडकी उघडण्यासाठी आला असता आतील सामानाची तोडफोड केल्याचे व मधल्या खिडकीची काच फोडल्याचे आढळले.
याची माहिती कर्मचाऱ्याने वरिष्ठांना देताच स्टेशन अधीक्षक अभिजित चोहान, व रेल्वे सुरक्षा बलचे सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर सिंह, वरिष्ठ निरीक्षक सुधीर अग्निहोत्री, वरिष्ठ रेल्वे पोलीस निरीक्षक भास्कर पवार, भाईंदरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे, वरिष्ठ तिकीट बुकिंग निरीक्षक प्रदीप घरत आदींसह कर्मचारी, पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली.
समोरच्या बाजूने लोखंडी जाळीतील लहानश्या गळ्यातून चोरटा पहाटे अडीज च्या सुमारास आतमध्ये शिरल्याचे स्पष्ट झाले आहे. एकही टाळे तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळून आलेले नाही.
चोरट्याने आत प्रवेश करून मधल्या तिकीट खिडकीची जाड काच कुठल्या तरी वस्तूने तोडून मुख्य केबिन मध्ये प्रवेश केला. आतील कागद आदी अस्ताव्यस्त केले. प्रत्येक तिकीट खिडकी चे असे एकूण 3 संगणक , प्रिंटर ची तोडफोड केली आहे. तेथील सर्व्हर नेटवर्किंग तसेच संगणक आदींच्या केबल ओढून काढल्या आहेत.
सुदैवाने तिकीट आरक्षणा ची रक्कम रात्रीच नेली जात असल्याने रोख रक्कम गेली नाही. चोरीच्या प्रयत्नात चोरटा सुद्धा जखमी झाला असून रक्ताचे डाग आढळून आले आहेत.
रेल्वे तिकीट घर बंद करण्यात आले असून भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. तिकीट खिडकी बंद झाल्याने प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.