जिल्ह्यात ठिकठिकाणी कोसळल्या पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:29 AM2019-11-09T00:29:14+5:302019-11-09T00:29:32+5:30
चक्रीवादळाचे संकट निवळले : सरासरी ३१ मिमी पावसाची नोंद
ठाणे : समुद्रातील ‘महा’ चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्याला बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात करून सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र, तीन दिवसांच्या कालावधीत कोणतेही संकट उद्भवले नाही. परंतु, गुरुवारी रात्रीपासून केवळ पावसाच्या सरी ठिकाठिकाणी पडल्याने सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले होते.
ठाणे शहरात पहाटे ५ वाजेपासून पाऊस पडला. यामुळे वाहतूकसेवेवरही परिणाम झाला. उपनगरीय वाहतुकीचे वेळापत्रक दुपारपर्यंत पूर्णपणे कोलमडले होते. हिरानंदानी इस्टेटमध्ये अभिषेक विश्वकर्मा (२५) युवक लिफ्टमध्ये अडकला असता त्यास अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. याशिवाय, उल्हासनगर येथील फर्निचर बाजारात आग लागल्यामुळे एक दुकान सकाळच्या वेळी जळाले. याव्यतिरिक्त अन्य कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण विभागाने सांगितले.
जिल्ह्यात सर्वाधिक ठाणे शहरात २० मिमी पाऊस : जिल्हाभरात ३१ मिमी म्हणजे सरासरी ४.४३ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक २० मिमी ठाणे शहरात पडला असून उल्हासनगरला चार, भिवंडीला पाच आणि मुरबाडमध्ये दोन मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.