प्रख्यात महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक, बेकायदा सीडीआर प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 05:40 AM2018-02-03T05:40:38+5:302018-02-03T05:40:58+5:30
मोबाइल नंबरचा सीडीआर (कॉल्सचा तपशील) बेकायदेशीरपणे मिळवून, त्याची विक्री करणा-या टोळीतील आणखी ३ खासगी गुप्तहेरांना ठाणे पोलिसांनी अटक केली. यात देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांचाही समावेश आहे.
ठाणे : मोबाइल नंबरचा सीडीआर (कॉल्सचा तपशील) बेकायदेशीरपणे मिळवून, त्याची विक्री करणाºया टोळीतील आणखी ३ खासगी गुप्तहेरांना ठाणे पोलिसांनी अटक केली. यात देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांचाही समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक आरोपींची संख्या ७ झाली आहे.
कुणाच्याही मोबाइल नंबरचा सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून, तो १० ते १२ हजार रुपयांमध्ये विकण्याचे काम करणाºया ४ खासगी गुप्तहेरांना ठाणे पोलिसांनी २४ जानेवारी रोजी अटक केली होती. या प्रकरणी शुक्रवारी दादर येथील नामांकित खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक करण्यात आली. त्यांनी आरोपी समरेश ननटून झा उर्फ प्रतीक मोहपाल याच्याकडून बेकायदेशीरपणे सीडीआर मिळविल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात यापूर्वी वाशी येथील माकेश पांडियन, कोपरखैरणे येथील प्रशांत श्रीपाद पालेकर, गिरगाव येथील जिगर विनोद मकवाना आणि ठाण्यातील समरेश ननटून झा उर्फ प्रतीक मोहपाल यांना अटक करण्यात आली होती. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने गुरुवारी संतोष पंडागळे आणि प्रशांत सोनवणे या आणखी दोन गुप्तहेरांना अटक केली. या दोघांच्या नवी मुंबई येथे खासगी गुप्तचर संस्था आहेत. पंडागळे आणि सोनवणे हे कोपरखैरणे येथील प्रशांत श्रीपाद पालेकर याच्याकडून मोबाइल फोनचे सीडीआर मिळवायचे, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
पोलिसांनी आरोपींजवळून १७७ मोबाइलधारकांचे सीडीआर हस्तगत केले आहेत. हे सीडीआर कुणाचे आहेत, त्याचा वापर कशासाठी केला जात होता आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे ते कुणाला पुरविण्यात आले, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.
विमा कंपन्यांची चौकशी
आरोपींनी काही विमा कंपन्यांना मोबाइलधारकांचे सीडीआर पुरविल्याचे यापूर्वी तपासात उघड झाल्याने, काही विमा कंपन्यांच्या ६ प्रतिनिधींची चौकशी पोलिसांनी केली.
अपघाताचे दावे निकाली काढण्यासाठी संबंधितांच्या मोबाइल फोनचे सीडीआर विमा कंपन्या मिळवित असतात.
मात्र, अपघातांच्या दाव्यांशी संबंधित कामाचा काही भाग कंपन्या खासगी संस्थांकडून ‘आउटसोर्सिंग’ करतात. त्यामुळे सीडीआरचा संबंध थेट विमा कंपन्यांशी येत नसल्याची माहिती या प्रतिनिधींनी पोलिसांना दिली.
कोण आहेत रजनी पंडित
देशातील पहिल्या महिला गुप्तहेर म्हणून रजनी पंडित यांची ख्याती आहे. त्या ५०पेक्षा जास्त पुरस्कारांच्या मानकरी आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील जवळपास साडेसात हजार प्रकरणांचा छडा लावल्याचा दावाही त्या करतात. त्यांचे वडील शांताराम पंडित हे मुंबई पोलीस दलामध्ये होते. खासगी गुप्तहेरांच्या क्षेत्रात त्या लेडी जेम्स बाँड म्हणूनही ओळखल्या जातात.