लेखका एव्हढाच वाचक ही प्रतिभावान असतो - संजय जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:37 PM2018-07-21T16:37:38+5:302018-07-21T16:39:45+5:30
“टेक्नोलॉजी – तरून पिढी व साहित्य” या विषयावर जाहीर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन “वी नीड यु सोसायटी” या संस्थेने केले होते.
ठाणे : टेक्नोलॉजी हा शब्द गेली वीस वर्ष तीव्रतेने ऐकायला यायला लागला कारण याच काळात तो सामान्य जनतेच्या वापराचा व त्यामुळे परिचयाचा झाला. ही टेक्नोलॉजी विकसित करणारा वर्ग हा नैसर्गिक रीत्या युवा वर्ग आहे. त्याचा वापरही हाच वर्ग जास्त करत असतो. टेक्नोलॉजीचा प्रचंड वेग व वैश्विक स्वरूप अचंबित करणारे आहे.
पूर्वी साम्राज्य विस्तार व संरक्षण या दोन प्रेरणेतून नवनवीन कल्पना व त्याचा वापर केला जात होता. शस्त्र विकसित करण्यात आपली कल्पकता मानवाने विशेषत्वाने वापरली. या आधुनिक टेक्नोलॉजीचे परिणामही सर्वच मानवी जीवनावर होतच होते. व्यक्ती व समाज जीवनाची गुंतागुंत वाढली. यामुळे याचे विविध भाषेतील साहित्यात पडसाद उमटणे हे ही काल सुसंगतच आहे. या सर्वांची एकत्रित चर्चा मात्र फारशी होताना दिसत नाही. ती होणे हे गरजेचे आहे. कारण उद्याचा समाज टेक्नोलॉजी शिवाय जगू शकत नाही हे जसे खरे तसेच त्याचे चांगले व वाईट दोन्ही परिणाम मानवी जीवनाच्या सर्व बाजूवर होणार. या करता आपण त्याचा आवाका समजून घेऊन त्यावर काय उपाययोजना करायची किंवा करता येईल अशा भूमिकेतून 'टेक्नोलॉजी -तरुण पीढ़ी व साहित्य' या विषयावर जाहीर चर्चा आयोजित करण्यात आली आहे असे प्रस्ताविक संस्थेचे विश्वस्त जयंत कुलकर्णी यांनी केले. लोकजागर उपक्रमात वी निड यू सोसायटी या संस्थेने हा कार्यक्रम संयोजित केला होता.
सुरुवातीला निवेदन करतांना विवेक गोविलकर यांनी या विषयातील अन्तरप्रवाह मांडले. कॉरपोरेट क्षेत्रातील अनुभव व त्यावर आधारलेले साहित्य येत आहे. ही मराठी साहित्यतिल नव्या प्रवाहाची सुरवात आहे. गणेश मतकरी हे म्हणाले, की टेक्नोलॉजी बाबत मी सर्वसाधारण पणे बोलणार आहे. यात कोरपोरेट संस्कृती बाबत बोलणे हे ओघानेच आले. हे क्षेत्र नवे आहे याबाबत कमी लिहिल जाते. जे पुर्वी लिहिल जायचे ते मध्यमवर्ग केंद्रित होत. ८० नंतर ग्रामीण साहित्य नव्याने पुढे आले. नवीन प्रश्न समोर आले. शहरी भागात नवीन आर्थिक बदला नंतर जीवन शैलीत बदल झाले.सर्व जीवनच ढवळून निघाले. व्यक्तिगत संबंध, कुटुम्ब व्यवस्था यात बाय फोर्स अनेक बदल स्विकारावे लागतात. यात संघर्षही होणे अपरिहार्य होते. याचे पडसाद सहित्यात उमटणे हे ही स्वभाविकच। संजय जोशी यानी लेखका एव्हढाच वाचकही प्रतिभावान असतो व असला पाहिजे. तरच चांगले साहित्य निर्माण होते. मराठी सहित्यात समकालीन स्थितिला प्रतिसाद देण्याची परंपरा नाही. अनुभवा विना लिहू नये. कॉरपोरेट कथा वा कादंबरी अस काही नसत. तो अनुभव असल्यामुळे मी जे लिहिल ते कॉरपोरेट पार्श्वभूमीवर आधारित होत. सध्या पीढीतील अन्तर कमी होत आहेत. लहान भाऊ मोठ्या भावाला म्हणतो की आपल्यात अंतर वाढले आहे. तू मागच्या पीढिचा आहेस. इतक्या वेगाने परिस्थिति बदलत आहे. हे समजून न घेता यापुढे लेखन करता येणार नाही. हे लेखकानी व वाचकानीही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
मराठी साहित्यासाठी कठीण काळ आहे. कारण वाचकाची संख्या कमी होते आहे. असे निरीक्षण मतकरी यांनी नोंदवले. गोविलकर म्हणाले की वाचक संख्या कमी होते आहे हे पण दृष्य माध्यमात जेव्हा सैराट १०० कोटीचा टप्पा पार करतो तेव्हा संवादाचे माध्यम बदलत आहे. त्यात मराठी तगेल हे नक्की. जोशी म्हणाले कायम नकारात्मकता हे खरे नसते. शोषितांचे साहित्य आता थांबले असे नाही तर त्याची परिभाषा बदलली आहे. कारण जीवन शैलीतील बदल तिकड़ेही घडत आहे. आपण प्रतिसाद देण्यात कमी पडतो. अनेक तरुण तरुणी नवे लिखाण करत आहेत.