शेणवा/शहापूर : विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सह महाराष्ट्रातील अनेक भागांत पाणीटंचाईने जनतेला ग्रासले असताना, शहापूर तालुक्यातील शेकडो गाव - पाड्यांना डोळ्यासमोर धरणांतील पाणी दिसत असूनदेखील ते घेऊ शकत नसल्याने जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याच्या निषेधार्थ शहापुरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे येत्या १४ मे ते १७ मे दरम्यान शहापूर ते मंत्रालय जलदिंडी काढून राज्यकर्त्याना पाणीटंचाईचे विदारक वास्तव दाखवणार आहेत.मुंबईसह, ठाणे, कल्याण, भार्इंदर शहरांना तालुक्यातील तानसा, भातसा, मोडकसागर, मध्य वैतरणा धरणांतून पाणी पुरवठा बारामाही सुरळीत सुरु असतो. परंतु पावसाळ्याचे चार महिने सोडले तर ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला पाण्यासाठी मैलोमैल दरवर्षी फिरावे लागत आहे तालुक्याच्या पाणीटंचाईबाबत दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात चर्चा होते. मात्र पहिला पाऊस पडला की ती बंद होते. मंजूर झालेल्या नळपाणी योजनांचा भ्रष्टाचार, स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे पाण्यासाठी जनतेला वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र दरवर्षी दिसते. शहापूरच्या या कृत्रिम पाणीटंचाईवर कायमची मात तसेच त्यावर तोडगा काढण्यासाठी या जलिदंडीचे आयोजन केल्याचे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (वार्ताहर)
पाण्यासाठी शहापूरकरांची मंत्रालयापर्यंत जलदिंडी
By admin | Published: May 06, 2016 1:00 AM