नवी मुंबई : साडेबारा टक्के भूखंड वाटपासाठी गावनिहाय निश्चित केलेली (लिंकेज सेक्टर) अट राज्य सरकारने रद्द केल्याने भूखंड वाटपाच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाणे तालुक्यातील १६४ पात्रधारक प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाच्या नव्या निर्देशानुसार भूखंड वाटपासाठी आता ठाणे तालुका हा एकच नोड केल्याने पात्रताधारकांना उपलब्ध भूखंडांचे वाटप करणे शक्य होणार आहे. त्यामुळे लिंकेज सेक्टरमध्ये भूखंड उपलब्ध नसल्याने रखडलेल्या साडेबारा टक्के योजनेतील भूखंड वाटप प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठाणे तालुक्यात भूखंड वाटपाची मोजकीच प्रकरणे शिल्लक आहेत. परंतु प्रकल्पग्रस्तांची पात्रता शिल्लक असूनही त्यांना लिंकेज सेक्टरमध्ये भूखंडाचे वाटप करण्यास सिडकोकडे जागाच शिल्लक नाही. ठाणे तालुक्यातील संपूर्ण सिडको क्षेत्रासाठी एकच नोड गृहित धरून पात्रताधारकांना उपलब्ध असतील तेथे भूखंड देण्याचा प्रस्ताव सिडकोने १८ एप्रिल २0१८ रोजी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ जानेवारी २0१९ रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार सिडकोला त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार नगरविकास विभागाने दिले आहेत. मात्र, ठाणे तालुक्यासाठी एक नोड हे धोरण लागू करण्यापूर्वी सिडकोने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटपासाठी त्या नोड (लिंकेज सेक्टर) मध्ये असलेल्या भूखंडांची व शिल्लक राहिलेल्या पात्रताधारकांची यादी भूखंडाच्या क्षेत्रफळासह सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, तसेच भूखंडाचे वाटप केवळ लॉटरीद्वारेच करण्यात यावे अशी, अट सिडकोला घातली आहे. त्यामुळे मागील चार वर्षापासून ठाणे तालुक्यात रखडलेल्या साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेला आता गती मिळेल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला आहे.