कल्याणची वाहतूककोंडी सोडवा; सभागृह नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 12:36 AM2020-01-17T00:36:32+5:302020-01-17T00:36:45+5:30

सध्या दुर्गाडी ते टिटवाळा रिंगरोड व दुर्गाडी पुलाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच मेट्रोही दुर्गाडी सर्कलमार्गे येत आहे. त्यामुळे दुर्गाडी हे भविष्यातील कोंडीचे जंक्शन असेल.

Relieve traffic congestion; House leaders demand Chief Minister | कल्याणची वाहतूककोंडी सोडवा; सभागृह नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

कल्याणची वाहतूककोंडी सोडवा; सभागृह नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

Next

कल्याण : नवीन पत्रीपूल आणि दुर्गाडी खाडीवरील नवा सहापदरी उड्डाणपूल खुला झाल्यावर कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सुटेल, असा दावा केला जात असला तरी त्यामुळे गोविंदवाडी सर्कल व दुर्गाडी चौकात वाहतुकीचा ताण वाढणार आहे. तेथे त्यासाठी पुन्हा नव्याने पूल उभारण्याची मागणी सभागृहनेते श्रेयस समेळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात समेळ यांनी पत्रव्यवहार केला असून, त्यात काही सूचना केल्या आहेत.

कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा कल्याण-शीळ रस्त्यावरील ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक झाल्याने तो पाडण्यात आला. त्यामुळे कल्याणच्या वाहतूककोंडीत भर पडली. पत्रीपूल नव्याने उभारला जाणार असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पूल फेब्रुवारीअखेर खुला करण्यात येणार असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे. सध्याचा पूल व नव्याने होणारा पत्रीपूल त्याच्याशेजारी आणखी एक तिसरा पूल प्रस्तावित आहे. त्याचे कामही जूनमध्ये सुरू होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कल्याणहून कचोरेमार्गे कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याकडे जाण्यासाठी पोहोच रस्ता नीट नसेल तर तेथे पुन्हा वाहतूककोंडीची समस्या राहील. याशिवाय, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नजीकहून दुर्गाडी ते पत्रीपूल हा गोविंदवाडी बायपास रस्ता आहे. या सर्कलला वाहतूककोंडी होणार आहे. त्यावर तोडगा म्हणजे मेट्रो मॉल ते गोविंदवाडी बायपास रस्त्याच्या सर्कलपर्यंत एक नवा उड्डाणपूल उभारल्यास कोंडी होणार नाही. तसेच सहापदरी पत्रीपुलाच्या बांधणीचा उद्देश सफल होऊ शकतो, असे समेळ यांचे म्हणणे आहे.

दुर्गाडी हे भविष्यातील कोंडीचे जंक्शन
सध्या दुर्गाडी ते टिटवाळा रिंगरोड व दुर्गाडी पुलाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच मेट्रोही दुर्गाडी सर्कलमार्गे येत आहे. त्यामुळे दुर्गाडी हे भविष्यातील कोंडीचे जंक्शन असेल. खाडीपुलाच्या तीन मार्गिका मे अखेरपर्यंत खुल्या करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. मात्र, गोविंदवाडी बायपासने येणारी वाहतूक दुर्गाडी चौकाला वळसा मारून जाते. त्याऐवजी सध्या वाहतुकीसाठी बंद केलेला ब्रिटिशकालीन खाडीपूल पाडून नवा पूल त्यामार्गे गोविंदवाडी ते कोनगाव, असा प्रस्तावित केल्यास दुर्गाडी चौकातील वाहतुकीचा ताण कमी होईल. तसेच खाडीपुलाच्या बांधणीचा उद्देश सफल होईल. तेथेही नवा पूल हवा असल्याची मागणी समेळ यांनी केली आहे.

Web Title: Relieve traffic congestion; House leaders demand Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.