पेंडसेनगरमधील रहिवासी वाहतूककोंडीमुळे त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 01:25 AM2020-11-20T01:25:30+5:302020-11-20T01:25:54+5:30
‘दक्ष’कडे तक्रारी : अरुंद रस्त्यांमुळे फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद असल्याने ठाकुर्लीतील पुलावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे पूर्वेला जोशी हायस्कूल, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, पंचायत विहीर परिसरात वाहतूककोंडी होत असल्याने तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. अरुंद रस्त्यांमुळे कोंडी होऊन वाहने त्यात अडकून पडतात. सतत हॉर्न वाजवण्यात येत असल्याने ध्वनिप्रदूषणही वाढल्याची व्यथा रहिवाशांनी ‘डोंबिवली : ॲक्शन कमिटी फॉर सिव्हीक ॲण्ड सोशल होप्स’कडे (दक्ष) मांडल्या आहेत.
केडीएमसीच्या निवडणुकीच्या काळात जनतेचा जाहीरनामा जाहीर करण्यासंदर्भात दक्ष समितीने नागरिकांकडे प्रभागनिहाय समस्यांच्या नोंदी संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हाॅट्सॲपवर प्रभागनिहाय ग्रुप तयार केले आहेत. पेंडसेनगरमधील भागातील रहिवाशांनी त्यावर सर्वाधिक समस्या मांडल्या आहेत.
डोंबिवली पूर्व-पश्चिमेला येजा करणारी लहान व अवजड वाहने सध्या ठाकुर्ली पुलावरून येजा करत आहेत. त्याचा ताण पेंडसेनगरमध्ये जाणवत आहे. मात्र, आरटीओ, वाहतूक पोलीस अधिकारी ही कोंडी फोडण्यासाठी उपलब्ध नसल्याने आंध्र बँकेच्या चौकात सायंकाळी कोंडी होते. जोशी ते मंजुनाथ शाळांंदरम्यान खड्डे आहेत. रस्त्यांवरील गतिरोधकाची स्थिती योग्य पद्धतीने नाही. गल्ली नंबर ४ व ५ च्या कोपऱ्यावरील स्टॅण्डवर रिक्षांची अस्ताव्यस्त रांग असते. त्यामुळे कोंडीत अधिक भर पडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या कोंडीत रुग्णवाहिका, दुचाकी अडकून पडल्यास ते कर्कश हॉर्न अथवा सायरन वाजवतात. त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी या ठिकाणी दिवसरात्र तेथे वाहतूक पोलिसांची गरज असल्याचे मत मांडण्यात आले. शिवाय, पोलिसांची गस्तही दिसत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आरोग्य समस्येची भीती
नेहरू मैदानात कबुतरांना खायला घातले जाते. त्यामुळे तेथे खेळायला, फिरायला जाणाऱ्या आबालवृद्धांच्या आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. डॉ. गुरव यांच्यासमोर मैदानालगत कचरा उघड्यावर टाकला जातो, आदी समस्या नागरिकांनी मांडल्या आहेत.