अनिकेत घमंडी
डोंबिवली : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, या काळात रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, कल्याण आरटीओ हद्दीतील सुमारे ६० हजार रिक्षाचालकांना ही मदत मिळण्यास किमान महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जूनमध्ये त्याचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.
याबाबत आरटीओ अधिकारी तानाजी चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारच्या घोषणेनुसार पात्र रिक्षाचालकांना दीड हजाराचे वाटप करण्यासाठी एक सॉफ्टवेअर बनविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी महिना लागणार असल्याचे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले होते. हे सॉफ्टवेअर कल्याण आरटीओला कार्यालयाला मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. अडचणी आणि प्रत्यक्ष मदत, यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मदत देताना त्यात पारदर्शकता असावी, यासाठी ती थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
रिक्षांच्या युनियनसाठी एखादी लिंक तयार करून त्याद्वारे माहिती संकलनाचे काम सुरू असल्याचे ऐकिवात होते; परंतु तसे काहीही नाही. आरटीओनेही अजून कोणतीही माहिती मागवलेली नाही. - दत्ता माळेकर, अध्यक्ष, वाहतूक सेल, कल्याण जिल्हा, भाजप
मुख्यमंत्र्यांनी रिक्षाचालकांना मदत मिळेल असे जाहीर केले; पण त्यानंतर आता दुसऱ्यांदा कडक निर्बंध वाढविले असून, मदत मिळालेली नाही. आरटीओकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. मदत वेळेवर मिळाली तरच त्याचा खरा फायदा, अन्यथा रोजच्या समस्या वाढत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा अनेकांना प्रश्न आहे. - शेखर जोशी, उपाध्यक्ष, रिक्षा चालक-मालक युनियन.