उल्हासनगर : खड्डे बुजवण्याची जबाबदारी महापालिकेची असताना त्यासाठी वाहतूक पोलीस मेहनत घेत असल्याचे चित्र उल्हासनगरमध्ये दिसत आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी मंगळवारी सकाळी वाहतूक पोलिसांनी शहाड फाटक परिसरातील रस्त्यांवरील खड्डे भरले. खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महापालिकेने तातडीने खड्डे बुजवणे आवश्यक असल्याचे वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी सांगितले.
शहाड रेल्वे स्टेशन परिसर व शहाड फाटक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दुचाकीस्वारांच्या जीवाला असलेला धोका टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वार्डनच्या मदतीने दगडी चुरा आणि रेतीने स्वत: हे खड्डे बुजवले. महापालिकेने ६० लाखांच्या निधीतून कोल्डमिक्स पद्धतीने खड्डे भरण्याचे काम सुरू केले. मात्र, खड्डे ‘जैसे थे’ आहेत. तसेच दोन कोटींच्या निधीतून हॉटमिक्स पद्धतीने खड्डे भरण्याला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. ऐन गणेशोत्सवात संततधार पाऊ स सुरू झाल्याने खड्डे भरण्याच्या कामाला बे्रक लागला. बाप्पाचे आगमन व दीड दिवसाच्या बाप्पांचे विसर्जनही खड्ड्यांतून होत आहे. गणेश उत्सवापूर्वी मनसेने प्रतिकात्मक बाप्पाच्या हातून खड्डे भरण्याचे आंदोलन केले होते. महापालिका कारभाराबाबत गणेशभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. तर वर्दळीचा रस्ता व मुख्य चौक आदी ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.