टक्केवारीच्या टोळीमुळेच ठाण्यातील रस्ते खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:44 AM2021-09-25T04:44:13+5:302021-09-25T04:44:13+5:30
ठाणे : एकीकडे ठाण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आपल्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फैलावर घेतले असतानाच दुसरीकडे वाहतूक कोंडीवरून विरोधकांनीही ...
ठाणे : एकीकडे ठाण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आपल्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फैलावर घेतले असतानाच दुसरीकडे वाहतूक कोंडीवरून विरोधकांनीही टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी खड्डे बुजविण्यासाठी झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिकाच काढण्याची मागणी शुक्रवारी केल्याने सत्ताधारी आणि प्रशासन चांगलेच कात्रीत सापडले आहे.
महापालिका आणि एमएसआरडीसीअंतर्गत दरवर्षी खड्डे बुजवण्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो; पण ते पुन्हा ‘जैसे थे’ होतात. याला निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणारे ठेकेदार जबाबदार आहेतच. शिवाय, टक्केवारीची टोळीही तेवढीच जबाबदार असा आरोप करून जनतेसमोर खर्चाचा तपशील आला पाहिजे. यासाठी गेल्या पाच वर्षांत झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केळकर यांनी केली.
पालकमंत्री एकनाथ शिंदे खड्ड्यांचा दौरा तातडीने करीत आहेत. तेच गेली पाच वर्षे पालकमंत्रीही आहेत. ते एमएसआरडीसीचेही मंत्री आहेत. त्यांनी किती ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले? किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली, हे जाहीर करावे. पुढील काळात खड्डे, वाहतूककोंडी आणि अपघातांबाबत अशी गंभीर परिस्थिती होऊ नये, यासाठी कृती आराखडा ठरविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलविण्याचीही मागणीही त्यांनी केली.