भाईंदर : काही दिवसांपूर्वीच मीरा रोडच्या शांतीनगर मधील सोसायटीला नळ जोडणी झाली नसतानाही पाण्याचे बील पाठवण्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच मीटर रिडींग न घेताच महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग खोटे रिडींग टाकून नागरिकांकडून पाणीपट्टीच्या आड लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ५४ हजार इतकी फेब्रुवारीत रिडींग असताना पालिकेने मात्र आधी ५ लाख व नंतर ५ लाख ८० हजार इतके रिडींग नोंदवून पाणीपट्टीचे बील वसूल केले आहे.
मीरा भार्इंदर महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग हा आधीपासूनच घोटाळेबाज आणि भ्रष्टाचारी विभाग म्हणून ओळखला जातो. तशा विविध प्रकारच्या तक्रारी आहेत. बोगस वा अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे नळजोडण्या देणे, अनधिकृत नळजोडण्या नियमित करणे, अनधिकृत बांधकामांना नळ जोडण्या देणे, दुसऱ्याच्या नावाची नळ जोडणी तीही चक्क इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या सदनिकेला देणे, चोरीच्या नळ जोडण्यांना पाठीशी घालणे, बांधकाम सुरु असताना नळजोडण्या देणे, रिडींग न घेणे वा कमी दाखवणे, टँकर पुरवठा घोटाळा अशा अनेक तक्रारी पाणीपुरवठा विभागा बद्दल आहेत.
काही दिवसांपूर्वीच मीरा रोडच्या शांतीनगर मधील एका इमारतीला नळजोडणी केली नसतानाही चक्क हजारो रुपयांचे पाणीपट्टीचे बील पालिकेने पाठवले होते. रहिवाशांनी तक्रार केली व त्याला प्रसिध्दी माध्यमातून वाचा फुटल्यानंतर बील चुकून गेल्याचे कारण पालिकेने दिले. पालिका निवासी वापरासाठी १३ रुपये प्रती हजार लिटर पाणीपट्टी आकारते.
उत्तनच्या केशवसृष्टी मार्गावर राहणाºया वेलेन्सिया गोम्स यांना तर पाणी मीटरचे ५४ हजार इतके रिडींग असताना पाणीपुरवठा विभागाने ते चक्क ५८ लाख इतके मीटर रिडींग नोंदवत त्या आधारे पाण्याचे बील पाठवले आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ असे हे तीन महिन्याचे बील असून १ हजार ४२ इतकी बिलाची रक्कम आहे. या आधीचे मे ते आॅगस्ट २०१९ या कालावधीतील मीटर रिडींग देखील तब्बल ५ लाख इतके नोंदवत चार हजाराचे पाणीपट्टी बील त्यांना पाठवले होते. ते गोम्स यांनी भरलेही. पण त्यांना त्यांची आई राहत असलेल्या इमारतीच्या पाणी बिलाबाबत समजल्यावर त्यांनी स्वत:चे पाण्याचे बिल तपासले असता हा प्रकार उघड झाला.
फेब्रुवारी मध्ये त्यांच्या पाणी मीटरचे रिडींग ५४ हजार आहे तर ५ लाख व ५ लाख ८० हजार इतके रिडींग आले कुठून? असा सवाल केला आहे. त्यांनी या चुकीच्या रिडींगबद्दल तक्रार करत पैसे परत मागितले आहेत. मला माझी आई राहत असलेल्या इमारतीच्या पाणीपट्टी व मीटर रिडींगबाबत कळल्यावर मी माझ्या राहत्या घराचे आलेले पाण्याचे बिल व प्रत्यक्ष मीटर मधील रिडींग घेतले असता मला धक्काच बसला. ५४ हजार इतकेच रिडींग असताना आधीच्या तिमाहीत ५ लाख रिडींग व आताच्या बिलात ५ लाख ८० हजार इतके रिडींग नमूद करून माझ्याकडून पाणीपट्टी वसूल केली आहे. आपले पैसे आपण परत मागितले असून शहरातील नागरिकांनीही आपले बिल आणि प्रत्यक्ष मीटर मधील रिडींग तपासावी.- वेलेन्सिया गोम्स, नागरिक