ठाणे : यंदा नालेसफाईची कामे रोबोट मशीनद्वारे करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असतानाच आता शहरात असलेल्या जलकुंभ, ईएसआरसी आणि जीएसआरची साफसफाई रोबोटीक मशीनद्वारे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेतला आहे. यापूर्वी ठाणे महापालिकेत जलकुंभाची साफसफाई करण्यासाठी कंत्राटदारांची रीघ लागत होती. परंतु, आता या मशीनमुळे त्यांचे कंबरडे मात्र मोडणार आहे. तसेच कोणतेही शटडाऊन न घेता पाणीपुरवठा सुरळीत ठेवून ही सफासफाई केली जाणार असल्याने ठाणेकरांवरील अतिरिक्त पाणीकपातीचे संकट कमी होईल.मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिका आता शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई रोबोटीक मशीनद्वारे करणार आहे. मागील महासभेत यासंदर्भातील विषय मंजूर झाला आहे. दरम्यान, आता शहरात असलेल्या जलकुंभांची सफाईदेखील याच धर्तीवर करण्याचा निर्णय घेऊन यासंदर्भातील प्रस्ताव २० एप्रिलच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. यासाठी तीन कोटी खर्चून एक रोबोटीक मशीन खरेदी केली जाणार आहे. ती जलकुंभात पाणी असतानाच साफसफाई करणार आहे. तसेच संप, पंप, ईएसआर, जीएसआरचीदेखील साफसफाई करणार आहे. यापूर्वी हे काम कंत्राटदाराला दिले जात होते. दरवर्षी यासाठी सुमारे एक कोटीचा खर्च केला जात होता. त्यामुळे सफाई करण्यासाठी खाजगी कंत्राटदारांची स्पर्धा पालिकेत लागत होती.
रोबोट करणार जलकुंभाची सफाई
By admin | Published: April 14, 2016 12:15 AM