- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचनेचे कच्चे आराखडे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून प्रभाग रचनेत दलितवस्ती फोडण्यात आल्याचा आरोप रिपाईचे जिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी केला. आयुक्त डॉ राजा दयानिधी यांची मंगळवारी भेट घेऊन चर्चा केली असून वेळ पडल्यास निवडणूक आयोग व न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे ते म्हणाले.
उल्हासनगर महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक फेब्रुवारी सन २०२२ दरम्यान होणार असून नवीन बहुसदस्यीय प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या दरम्यान नवीन प्रभाग रचना करतांना अनुसूचित जातीच्या जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येऊ नये म्हणून, दलीतवस्तीचे विभाग फोडण्याचे षडयंत्र काहीजण करीत असल्याचा आरोप रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी केला. याबाबत त्यांनी आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या सोबत दुपारी साडे तीन वाजता चर्चा केली. मात्र आयुक्तां सोबतच्या चर्चेत समाधान न झाल्याने, निवडणूक आयोग व न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा दिला. तसेच वेळ प्रसंगी रस्त्यात उतरून नवीन प्रभाग रचनेत दलीतवस्त्या फोडू देणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांना दिली.
महापालिका वार्डाची रचना ही तीन सदस्यीय पध्दती प्रमाणे करण्याचे काम सुरू असून महापालिकेत एकून २६ प्रभाग असणार आहे. ७८ पैकी १३ वॉर्ड अनुसूचित जातीचे तर एक अनुसुचित जमातीचा असणार आहे. महापालिका अधिकारी राजकीय दबावाखाली नवीन प्रभाग रचना प्रक्रिया करीत असून या प्रक्रियेला रिपाइं विरोध करणार असल्याचे उपमहापौर भालेराव यांनी सांगितले. अनुसुचित जातीचे नगरसेवक निवडुन येवु नये, असा यामागील हेतू असल्याचे ते म्हणाले. जर अनुसूचित जातीचे वार्ड व त्याच्या सिमा रेषा फोडण्याचा प्रकार झालातर, राज्य निवडणुक आयोगासह न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा त्यांनी पत्रकारां सोबत बोलतांना दिला. यावेळी त्यांनी शहरातील रिपाईच्या गटातटांनी याविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन केले.