शिक्षण क्षेत्रालाही लागली भ्रष्टाचाराची कीड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:27 AM2017-07-31T00:27:44+5:302017-07-31T00:27:44+5:30
मीरा- भार्इंदर महापालिका झाल्यावर जिल्हा परिषदेच्या शाळा व शिक्षक पालिकेच्या शिक्षण मंडळाकडे वर्ग झाले. महापालिका शाळा इमारतीच्या बांधकामासाठी कोट्यवधींचा खर्च करते.
मीरा- भार्इंदर महापालिका झाल्यावर जिल्हा परिषदेच्या शाळा व शिक्षक पालिकेच्या शिक्षण मंडळाकडे वर्ग झाले. महापालिका शाळा इमारतीच्या बांधकामासाठी कोट्यवधींचा खर्च करते. विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्ये दिले जाते. पण आजही ४ थी, ५ वीच्या विद्यार्थ्याला धड वाचता येत नाही अशी स्थिती आहे. मनापासून शिकवण्याचे काम हल्लीचे शिक्षक करत नाही. शाळेच्या वेळेत विविध कारणांनी बाहेर जाणे, वा स्वत:ची कामे करत बसणे असे प्रकार या आधीही पाहणीत उघड झाले आहेत. या सर्व गोष्टींचा जाब शिक्षण अधिकारी वा एकही पालिका अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी कधी विचारत नाही. मूळात त्यांनाही पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढवण्याबद्दल स्वारस्य नाही. या सर्वांना स्वारस्य असते ते फक्त टेंडर, टक्केवारी आणि बदल्या, पदोन्नती, वेतनवाढ, निवृत्तीवेतन, देयक मंजुरीमध्ये.
शिक्षण विभागातील अनागोंदी व भ्रष्टाचार नवीन नाही. याआधीही एका शिक्षण अधिकाºयासह पालिका लिपिकास एका शाळा चालकाकडून लाच घेताना अटक झाली होती. तर पालिकेच्या एका बालवाडी शिक्षिकेलाही लाच घेताना पकडले होते. शिक्षणाधिकारी हाच मुख्यत्वे या विभागाचा कारभार पाहत असला तरी पालिका उपायुक्त, आयुक्तांचीही जबाबदारी असतेच. पण शिक्षणाधिकारी हा क्वचितच प्रत्येक प्रस्ताव वा प्रकरण घेऊन स्वत: आयुक्त वा उपायुक्तांकडे जातो. विक्रमकुमार आयुक्त असताना तर शिक्षणाधिकाºयाची जायची हिमतही होत नव्हती. परंतु अशा कामचुकार व जबाबदारी न घेणाºया शिक्षणाधिकाºयावर कुणाचा धाक नसतो हे देखील सत्य आहे.
उपशिक्षक असलेला अनिल आगळे याला फरीदा कुरेशी या शिक्षिकेकडून वाढीव वेतनश्रेणी मंजूर करावी म्हणून ५ हजाराची लाच घेताना अटक झाली.
मीरा गावातील पालिका शाळेत आगळे हा मुलांना शिकवताना कधीतरी दिसायचा. कारण तो नेहमीच शिक्षणाधिकाºया सोबतच असायचा. भार्इंदर पश्चिमेच्या पालिका शाळेत जेथे आगळेला पकडण्यात आले त्या शाळेशी वास्तविक त्याचा काहीएक संबंधच नव्हता. परंतु सुरेश देशमुख यांनी महापालिका शाळांमधील मुख्याध्यापकांची बैठक शाळेत बोलावली होती व स्वत: देशमुख आगळे याच्या गाडीतून शाळेत आले होते हे बरेच काही स्पष्ट करणारे आहे.
देशमुख यांनी या शाळेत मुख्याध्यापकांची बैठक सुरु केली त्यावेळी आगळे देखील तेथेच होता. तक्रारदार फरीदा कुरेशी या त्याच शाळेतील उर्दू माध्यमात शिकवत असल्याने त्या तेथेच होत्या. आगळेने बैठक सुरु असलेल्या खोलीबाहेरच शाळेच्या पॅसेजमध्ये बिनधास्त पैसे घेतले. यावरून तो किती निर्धास्त होता हे स्पष्ट होते.
कुरेशी सारख्या अनेक शिक्षकांना सेवेची १२ व २४ वर्ष पूर्ण होऊन अनेक वर्ष लोटली आहेत. परंतु त्यांना नियमानुसार वाढीव वेतनश्रेणी देण्यासाठी नेहमीच टोलवाटोलवी केली जाते. त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे केवळ वाढीव वेतनश्रेणीच्या रूपात मिळत नाही असा काही एकच प्रश्न प्रलंबित नाही.
शिक्षकांना सुट्टी तसेच बदल्या करण्यासाठीही सर्रास पैसे उकळले जातात. मूळात शिक्षकाच्या बदलीचे निकष व कालावधी निश्चीत
करतानाच पालिका शाळांच्या चक्रानुक्रमानुसार यादी तयार केली पाहिजे. परंतु शिक्षणाधिकारी बदल्या करताना काहींना लांब व अडचणीच्या ठिकाणी बदली करतात. मग तो शिक्षक वा शिक्षिका ही बदली रद्द करण्यासाठी धडपड करते. तर
बदली करण्या आधीच सोयीच्या ठिकाणी ती करण्यासाठीही खिसे भरले जातात.
एका मुख्याध्यापिकेला पदोन्नती व वाढीव वेतनश्रेणी मिळावी म्हणून अर्थपूर्णरित्या निवृत्तीच्या एक दिवसआधी पदोन्नती देण्यात आली. विशेष म्हणजे तिला मुख्याध्यापक म्हणून तो शेवटचा दिवस देखील शाळेत घालवता आला नाही असा भन्नाट किस्सा सांगितला जातो. मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यासाठीही बहुतांश शिक्षकांना अधिकाºयाचे खिसे भरावे लागले. त्यातही आगळे यानेच महत्वाची भूमिका बजावली.