QR कोड स्कॅन करा आणि मिळवा वृक्षाची माहिती; ठाण्यात महापालिकेचा प्रयोग

By अजित मांडके | Published: January 3, 2024 03:57 PM2024-01-03T15:57:25+5:302024-01-03T15:57:45+5:30

'उद्यानांमधील नावीन्यपूर्ण संकल्पना' या उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या २१ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुमारे २००० झाडांवर हे क्यू आर कोड लावण्यात आले आहेत

Scan the QR code and get tree information; Municipal experiment in Thane | QR कोड स्कॅन करा आणि मिळवा वृक्षाची माहिती; ठाण्यात महापालिकेचा प्रयोग

QR कोड स्कॅन करा आणि मिळवा वृक्षाची माहिती; ठाण्यात महापालिकेचा प्रयोग

ठाणे :  शहरातील असलल्या वृक्षांची माहिती ठाणेकरांना सहज कळावी, किंवा वृक्ष कोणत्या प्रजातीचे आहे, याची माहिती मिळावी या उद्देशाने ठाणे महापालिकेने पाऊल उचलले आहे. त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांबद्दलची माहितीसाठी झाडांवर क्यू आर कोड लावण्यात आला आहे. हा कोड मोबाईलवर स्कॅन केल्यावर नागरिकांना त्या झाडाबद्दलची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

'उद्यानांमधील नावीन्यपूर्ण संकल्पना' या उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या २१ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुमारे २००० झाडांवर हे क्यू आर कोड लावण्यात आले आहेत. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद, सूचना, अभिप्राय लक्षात घेवून महापालिका हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये अशाप्रकारे क्यू आर कोड लावण्याचा मानस असल्याचे उपायुक्त (उद्यान) मिताली संचेती यांनी सांगितले. आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निदेर्शानुसार महापालिकेची उद्याने अधिक नागरिक स्नेही करण्याचा प्रयत्न उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण करत आहेत. त्यानुसार, 'चला वाचूया' या मोहिमेत काही उद्यानात निसर्ग वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. त्यांना नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. त्याच मालिकेत आता हा क्यू आर कोड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त संचेती यांनी दिली.

प्रत्येक झाडाची नोंद करून त्यानुसार हे क्यू आर कोड तयार करण्यात आले आहेत. अशाप्रकारे सुमारे २००० झाडांची माहिती संकलित केली गेली आहे. त्या २००० हून अधिक झाडांवर हे क्यू आर कोड लावताना ते नायलॉन दोरीच्या साहाय्याने बांधण्यात आले आहेत. झाडांना कोणतीही इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे, असेही संचेती यांनी स्पष्ट केले.

अशी मिळेल माहिती
झाडावर लावण्यात आलेल्या क्यू आर कोड आपल्या स्मार्टफोन मध्ये स्कॅनरवर स्कॅन करायचा.
क्यू आर कोड स्कॅन केल्यावर विकिपीडिया या वेबसाईट वरील लिंक उघडेल. त्यावर क्लिक केल्यावर त्या झाडाची माहिती मिळेल.
ही माहिती मराठी व इंग्रजीत मिळू शकेल.
माहितीमध्ये झाडाचे नाव, बॉटनिकल नाव, झाडांचे वैशिष्ट्य, उत्पत्तीस्थान आदींचा समावेश आहे.

कोणत्या उद्यानात क्यू आर कोड
माजिवडा - मानपाडा - ट्रॅफिक पार्क, कै. शांताराम विश्राम शिंदे जैवविविधता उद्यान.
वर्तक नगर - कै. प्रमोद महाजन निसर्ग उद्यान, कै. वसंतराव डावखरे उद्यान
वागळे इस्टेट - हँगिंग गार्डन, लोकमान्य नगर - सावरकर नगर, कै. धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यान
उथळसर - कचराळी तलाव उद्यान, ब्रम्हाळा तलाव उद्यान, वृंदावन सोसायटी उद्यान
नौपाडा - कोपरी - लोकमान्य टिळक उद्यान, दत्ताजी साळवी निसर्ग शिक्षण केंद्र, श्री गणेश उद्यान, कै. नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, राम गणेश गडकरी रंगायतन उद्यान, दादोजी कोंडदेव क्रीडांगण उद्यान
कळवा - नक्षत्र वन, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय उद्यान, कै. मुकुंद केणी क्रीडा संकुल, खारेगाव तलाव
दिवा - खिडकाळी तलाव
मुंब्रा - राऊत उद्यान

Web Title: Scan the QR code and get tree information; Municipal experiment in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.