फी न दिल्यास निकाल न देण्याचा शाळांचा पवित्रा, पालक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 01:26 AM2020-09-03T01:26:15+5:302020-09-03T01:27:04+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली असल्यामुळे ते त्यांच्या पाल्यांची फी भरण्यास असमर्थ आहेत.
मुंब्रा: मागील तसेच चालू शैक्षणिक वर्षाची थकीत फी भरल्याशिवाय निकाल न देण्याचा पवित्रा मुंब्य्रातील काही शाळांनी घेतला आहे. यामुळे पालक संतप्त झाले असून अशा शाळांचा परवाना रद्द करण्याची मागणी शिक्षणमंत्र्यांकडे करण्याचा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली असल्यामुळे ते त्यांच्या पाल्यांची फी भरण्यास असमर्थ आहेत. ही व्यथा त्यांनी शाळांसमोर मांडल्यानंतरही काही शाळांनी फीसाठी आडमुठ्या धोरणाचा अवलंब केला आहे.
अर्ज भरण्यास अडचण
ज्या विद्यार्थ्यांची मागील शैक्षणिक वर्षाच्या काही महिन्यांची फी बाकी आहे, ती तसेच चालू शैक्षणिक वर्षाच्या आॅगस्ट महिन्यापर्यंतची फी भरल्याशिवाय गेल्या वर्षी झालेल्या वार्षिक परीक्षेचा निकाल न देण्याचा पवित्रा घेतला आहे. निकाल न मिळाल्यामुळे शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे पालक हवालदिल झाले आहेत.
शाळांचे परवाने रद्द करा
ज्या शाळा फीसाठी आडेमुठेपणा करतील, त्यांची तक्रार शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करून अशा शाळांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी करणार असल्याची माहिती ठामपाच्या परिवहन समितीचे सदस्य शमीम खान यांनी ैैैैैैैैै‘लोकमत’ला दिली.