कल्याण - स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ या उपक्रमात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चांगलाच पुढाकार घेतला असून आता शहरातील विविध शाळेमधील विद्यार्थ्यांनाही या सर्वेक्षणात पालिकेने सहभागी करुन घेतले आहे. या उपक्रमांस आज पासून शहरातील विविध दुर्लक्षित भिंतीवर स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश देणारा सप्तरंगी साज चढवला जात आहे. या भिंती रंगविण्यात विद्यार्थी देखली चांगलेच रमल्याचे दिसून आले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण -२०१८ या उपक्रमांतर्गत ओला व सुका कच-याचे वर्गीकरण करुन ओल्या कच-यापासून कंपोस्ट खत तयार करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध स्तरातील नागरिक, सामाजिक संस्था, शाळा महाविद्यालयांना सहभागी करुन घेणे, स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहर आणि प्रभाग निहाय स्वच्छता दुत नेमणे, मोबाईल अॅपद्वारे कच-याची तक्रार करण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करणे. रॅली काढणे, सभा घेणे, पत्रके वाटणे असे विविध कार्यक्रम राबविले जात आहे. यामध्ये आयुक्त पी. वेलरासू यांनी चांगला पुढाकार घेवून आपल्या अधिकारी व कर्मचा-यांना या कामात सहभागी करुन घेतले आहे.या उपक्रमाचा एक भाग म्हणून महापालिकेने शाळेतील विद्यार्थ्यांना महापालिका शाळा व परिसरातील ओस पडलेल्या व दुर्लक्षित भिंतींना नवसंजीवनी देण्यासाठी भिंतीवर स्वच्छ सर्वेक्षणाबाबत जनजागृतीपर भिंती चित्र काढण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.परिसरातील विविध भिंतीना पालिकेतर्फे व्हाईटवॉश करुन देण्यात आले आहे. त्यामुळे या भिंतीना नवा साज चढवण्यात विद्यार्थ्यांनाही उत्साह आला आहे. विशेष म्हणजे ठाकूरवाडी, डोंबिवली पश्चिम येथील संवाद कर्णबधीर शाळेतील मुलांनी देखिल भिंतीचित्रे रेखाटली आहेत. विद्यार्थ्यांच्या या आगळया वेगळया उपक्रमाचे कौतुक आयुक्त पी.वेलरासू यांनी केले आहे.महापालिका क्षेत्रातील तब्बल ५६ शाळेतील एकूण ३८४ विद्यार्थी व ५६ शिक्षकांनी स्वच्छ सर्वेक्षण भिंती चित्र उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. या भिंती चित्र उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने प्रमाणपञ दिले जाणार असुन, पहिल्या,दुस-या व तिस-या क्रमांकाने उत्तीर्ण होणा-या विदयार्थ्यांना महापौर राजेंद्र देवळेकर व आयुक्त पी. वेलरासू यांचे हस्ते गौरविण्यांत येणार आहे. हा अनोखा उपक्रम यशस्वी करण्यांसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाbचे उपायुक्त धनाजी तोरस्कर, शिक्षण विस्तर अधिकारी विजय सरकटे यांनी परिश्रम घेतले.