‘त्या’ उपअभियंत्याला महापालिकेत घेण्यासाठी सेनेची दुसरी लॉबी सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 01:33 AM2021-02-02T01:33:49+5:302021-02-02T01:34:14+5:30
नाकारलेले प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या महासभेत पुन्हा आर्थिक तरतुदीसाठी ठेवल्याने उपअभियंता रूपेश पाडगावकर यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली होती.
ठाणे - नाकारलेले प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या महासभेत पुन्हा आर्थिक तरतुदीसाठी ठेवल्याने उपअभियंता रूपेश पाडगावकर यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली होती. त्यांना निलंबित करण्यासाठी शिवसेनेच्या एका लॉबीने हट्ट केला होता. परंतु, आता त्याच उपभियंत्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी दुसऱ्या गटाने आयुक्तांकडे धाव घेतल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभागामध्ये उपअभियंता असलेल्या पाडगावकर यांच्याकडे बजेट व्यवस्थापनाचीही जबाबदारी होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडून आर्थिक स्थितीप्रमाणे कामाचे प्राधान्यक्रम निश्चित केले आहे. त्यानुसार कामांची यादी तयार करून त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येते.
संबंधित उपअभियंत्यांनी या कामांव्यतिरिक्त इतर कामांना अर्थसंकल्पीय तरतूद केली. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या ठरावाच्या अंमलबजावणीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच काही कामांसाठी निधी टाकण्यासाठीही त्यांच्यावर शिवसेनेच्या काही वरिष्ठ नगरसेवकांचा दबाव होता. परंतु, त्यांनी या नगरसेवकांची मर्जी राखली नसल्याने अखेर आयुक्तांकरवी या उपअभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली होती.
निलंबनाच्या या कारवाईवरून आता शिवसेनेतच जुंपली आहे. या कारवाइईनंतर दाेन गट आमनेसामने आल्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद उफाळून ताे चव्हाट्यावर आला आहे. ठाण्याच्या राजकारणात हा अंतर्गत वाद काय वळण घेताे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.