-आशिष राणे, वसई
पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची मुदत पूर्ण होण्याआधीच राज्यशासनाने बुधवारी बदलीचे आदेश केले असून त्यांच्या जागी आता मुंबई शुल्क नियामक प्राधिकरण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले एम. जी. गुरसळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी पालघर डॉ. कैलास शिंदे यांनी गतवर्षी जुलै-2019 मध्ये पदभार स्वीकारला होता. अवघ्या 13 महिन्यांच्या कारकिर्दीत पालघर जिल्ह्यात नानाविध समस्या, संकट यावर मात करीत त्यांचा कारभार सुरू होता. त्यातच यामध्ये नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाताना अजून एक जागतिक संकट ओढवल होत.
परिणामी दि.13 मार्च 2020 पासून कोरोना संक्रमण उद्धवले आणि याच 6 महिन्याच्या काळात स्वतः जिल्हाधिकारी डॉ शिंदे यांनी ग्रामीण व शहरी भागात कोरोना या जीवघेण्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी समनव्यातुन जिल्ह्यातील महसूल पोलीस व आरोग्य आदी यंत्रणा व त्यावरील अधिकारी नेमून स्वतः प्रभावी उपायोजना केल्या होत्या.
तीन महिने सांभाळला वसई विरार महापालिका आयुक्त पदभार !
विशेष म्हणजे पालघर जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी तीन महिने वसई विरार शहर महापालिका आयुक्त म्हणून देखील अतिरिक्त कारभार सांभाळला होता. या काळात त्यांनी वसई विरार महापालिका व जिल्हाधिकारी असे दुहेरी पद बऱ्यापैकी संभाळून सत्ताधाऱ्यांचे मन जिंकले होते. एकूणच बुधवारी शासनाने एकदम पालघर जिल्हाधिकारी यांच्या बदलीचे आदेश काढून जिल्हावासीयांना धक्काच दिला. तर जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांचा पदभार कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत उन्नत करून या जागी नेमणूक करण्यात आली असल्याचे या संदर्भातील आदेशात सामान्य प्रशासन सेवा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी म्हटले आहे.
पालघर जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी एम जी गुरसळ हे 2009 चे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असून त्यांचा सेवाकाळ हा सह सचिव पदाचा असल्याने पालघर जिल्हाधिकारी हे पद अपग्रेड करून सचिव गुरसळ यांना त्या ठिकाणी बसविण्यात आले आहे
अर्थातच हे राज्य शासनाचे विशेष प्रयोजन आहे
एखाद्या वरिष्ठ भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी यांची सेवा जर एकूण 16 वर्षाहून अधिक असेल तर त्या पदाला सह सचिव व त्या पुढचा दर्जा दिला जातो. मात्र त्यांना खालच्या पदावर नियुक्ती दिली जात असेल तर त्या पदाची श्रेणी वाढवून त्यानंतर नियुक्ती दिली जाते. त्यानुसारच सचिव एम जी गुरसळ यांना पालघर या आदिवासी बहुल क्षेत्र जिल्ह्यात नियुक्ती दिली गेली असल्याचे सूत्रा कडून समजते.