ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
By जितेंद्र कालेकर | Published: May 27, 2024 06:51 AM2024-05-27T06:51:47+5:302024-05-27T06:52:17+5:30
ठाण्यातही राजकोटसारखी दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: उन्हाळी सुटीसाठी ठाण्यातील शिवाजी मैदानात सध्या ठाणे कार्निव्हल भरविले आहे. त्यासाठी सशुल्क प्रवेश देण्यात येत असून खाद्य पदार्थांचे विविध स्टॉल व खेळण्यांची रेलचेल आहे. एकाचवेळी १०० ते १५० नागरिकांची गर्दी होणाऱ्या या गेमिंग झोनमधील तुटपुुंजी अग्निरोधक यंत्रणा तर आहेच शिवाय आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी मार्गही अपुरे आहेत.
राजकोटमधील गेमिंग झोनच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेमुळे जत्रेतील मोठे पाळणे आणि सुरक्षेचा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. जांभळी नाका येथे ८ जूनपर्यंत हा मेळा सुरू राहणार आहे. याठिकाणी १० ते १५ विविध विक्रीचे स्टॉल आहेत. ३४ फुटी उंच पाळणा आहे. सायंकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत भरणाऱ्या या मेळ्याला मोठी गर्दी होते.
मेळ्याच्या ठिकाणी सात ते दहा अग्निरोधक बाटले आहेत. परंतु, ते धूळ खात आहेत. याठिकाणी असलेल्या संतोष सिंग या कर्मचाऱ्याच्या माहितीनुसार प्रत्येक पाळणा आणि खेळण्याच्या ठिकाणी हे अग्निरोधक बाटले मेळा सुरू झाल्यानंतर ठेवले जातात. मेळ्यात जाण्यासाठी एकच मोठा मार्ग आहे. त्याच मार्गाने ग्राहक बाहेर पडतात. मात्र, बाहेर जाण्यासाठी दोन अन्यही मार्ग असून त्यातील एक लहान तर दुसऱ्या मार्गाच्या दरवाजाला कुलूप लावले आहे. तो मार्गही ऐनवेळी खुला केला जातो, असा दावा एका कर्मचाऱ्याने केला. मात्र, खाद्यपदार्थ व इतर स्टॉलनजीक अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसल्याचे आढळले. त्यामुळे ठाण्यातही राजकोटसारखी दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.
मुंबईत काय स्थिती?
मुंबई : मुंबईतील प्रत्येक बड्या मॉलमध्ये गेमिंग झोन आहे. सुटीच्या दिवशी चिमुकल्यांना घेऊन गेमिंग झोनकडे पालकांचा ओढा असतो. मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी सर्वांना सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होते की नाही? हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, पालिका, अग्निशमन दल यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनीही परवानगी देताना सर्व बाबी पडताळायला हवे, असेही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.