शिक्षक दिन : मोठे स्वप्न पाहण्याचे बीज शिक्षकांनीच मनात पेरले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 01:00 AM2019-09-05T01:00:46+5:302019-09-05T01:01:52+5:30

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांना वडिलांचे प्रोत्साहन तर शिक्षकांचे मिळाले मार्गदर्शन

The seeds of dreaming were sown by teachers ... thane | शिक्षक दिन : मोठे स्वप्न पाहण्याचे बीज शिक्षकांनीच मनात पेरले...

शिक्षक दिन : मोठे स्वप्न पाहण्याचे बीज शिक्षकांनीच मनात पेरले...

googlenewsNext

ठाणे : कुंभार जसे मडके घडवतो, तसे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. आयुष्यात आईवडिलांनंतर शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते. माझ्याही आयुष्यात मायबापानंतर शिक्षकाचे स्थान अनन्यसाधारण आहे. माझे गाव जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील काळखेडा. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत माझे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. शेणामातीने सारवलेल्या भिंती, वर्गखोल्यांतील जमीन, एकाच खोलीत बसवलेले चार वर्ग अशी माझी शाळा होती. पण, याच शाळेने आणि शाळेतील शिक्षकांनी मला घडवलं, मोठे स्वप्न पाहण्याचे बीज मनात पेरले आणि त्यामुळे आज मी भारतीय प्रशासकीय सेवेत रु जू झालो.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. पाचवी ते सातवीचे शिक्षण जिल्हा परिषद, वाघारी येथे दररोज दोन किमी पायी जाऊन केले. तर, त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी पारोळ्याला गेलो. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेताना शाळेतल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत राहिलो. यातून वक्तृत्व कलेची आवड निर्माण झाली. मला काळखेडाच्या शाळेत लाभलेले दौलतगुरुजी, गोसावीगुरुजी आणि बोंबलेगुरु जी या तिन्ही शिक्षकांनी माझ्या आयुष्याला समृद्ध बनवलं. त्यांनी दिलेली शिकवण, केलेले संस्कार आणि प्रसंगी केलेली शिक्षा यातून वेळोवेळी चूक-बरोबर समजत गेले.

गुरूजी प्रसंगी ओरडायचे, पण प्रेमाने समजवायचेही...
तेव्हाचे शिक्षक गावातच राहत असत, त्यामुळे जरी शाळा सकाळच्या सत्रात ठरावीक तासांची भरत असली, तरी शिक्षकांचा सहवास हा पूर्णवेळ मिळत होता. त्यामुळे शिक्षकांशी कौटुंबिक नातेसंबंध तयार झालेले असायचे. अनेकदा गुरूजी ओरडायचे, प्रसंगी कठोर वागायचे, पण त्यांच्या रागावण्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा दडलेला असायचा. तेव्हा, शिक्षकांविषयी आम्हाला आदरयुक्त भीती असे.

त्यावेळी गणित, इंग्रजीसारखे विषय जरी सामान्य मुलांना कठीण जात असले, तरी या तिन्ही शिक्षकांमुळे मला मात्र गणित आणि भाषा विषयाची गोडी निर्माण झाली. पायाभूत शिक्षणाचा भक्कम पाया प्राथमिक शिक्षणामुळे तयार होतो, हे मला आजही पदोपदी जाणवत राहते. त्यामुळे या तिन्ही शिक्षकांची आठवण जरूर येते. भावी पिढी संस्कारित करून निकोप समाजनिर्मिती करण्यात शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा आहे. शिक्षकांचे स्थान सर्वांच्याच आयुष्यात अनन्यसाधारण असते.

ताईच्या वर्गात बसल्याची मला आजही आठवण...
आज माझ्या शाळेचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. शेणामातीची शाळा आज सिमेंट काँक्रिटने उभी राहिली आहे. भौतिक सुखसुविधेने सज्ज आहे. गावाला जेव्हा कधी जाणं होत,ं तेव्हा आपोआप शाळेकडे पावलं वळतात. शिक्षकांशी गप्पा होतात. प्रसंगी मुलांशी संवाद साधतो आणि पुन्हा मला माझे शाळेचे सोनेरी दिवस आठवू लागतात. शाळेच्या पहिल्याच दिवशी मी माझ्या मोठ्या ताईच्या वर्गात बसलो होतो, त्याची मला आजही आठवण होते.

शिक्षकांमुळेच पाया भक्कम होत गेला...

Web Title: The seeds of dreaming were sown by teachers ... thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.