सेनेचे नगरसेवक, माजी महापौर देवळेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:53 AM2020-09-24T00:53:21+5:302020-09-24T00:53:33+5:30

कल्याण-डोंबिवलीत हळहळ : अभ्यासू कार्यकर्ता हरपल्याची खंत, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Sena corporator, former mayor Devalekar passes away | सेनेचे नगरसेवक, माजी महापौर देवळेकर यांचे निधन

सेनेचे नगरसेवक, माजी महापौर देवळेकर यांचे निधन

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर व शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर (५३) यांचे बुधवारी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, रवींद्र फाटक, माजी आमदार नरेंद्र पवार व अन्य पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचा एक चांगला अभ्यासू कार्यकर्ता हरपल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली.
कोरोना संकटाचे भय न बाळगता देवळेकर यांनी गरजूंना अन्नधान्याचे वाटप केले. परप्रांतीय मजुरांना गावी पाठवण्यासाठी फॉर्म भरून घेतले. पक्षाच्या विविध बैठकांना ते हजर राहत होते. आॅगस्टमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. कोरोनावर त्यांनी मात केली होती. मात्र, त्यांना दिलेली औषधे व इंजेक्शनचा दुष्परिमाण होऊन त्यांची प्रकृती खालावली. त्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
देवळेकर यांचा जन्म कोकणात झाला होता. कल्याणमध्ये त्यांनी शालेय शिक्षण, तर बिर्ला महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनात ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारावून गेले. त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेचे काम सुरू केले. १९८७ मध्ये राम मंदिर उभारणीकरिता सुरू केलेल्या रामशिला आंदोलनात ते सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन गंगापूजन केले, तेव्हा त्यातही ते सहभागी झाले होते.
अभ्यासू कार्यकर्ते असल्याने त्यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली गेली. या काळात त्यांनी चांगले काम केल्याने त्यांना नगरसेवकपदाची उमेदवारी दिली गेली. २००७ ते २००८ या कालावधीत ते स्थायी समिती सभापती झाले. त्यांच्या सभापतीपदाच्या कालावधीत मनपात काँग्रेस आघाडीची सत्ता होती. सभागृहात एखादा वादाचा प्रसंग घडला, तर चर्चेतून ते मार्ग काढत असत.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम मतदारसंघातून पक्षाने देवळेकर यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यावेळी भाजपने बंडखोरी करत अपक्ष उमेदवार उभा केल्याने मतांचे विभाजन झाले. त्यामुळे मनसेचे प्रकाश भोईर निवडून आले. २०१० मध्ये पुन्हा ते नगरसेवकपदी निवडून आले. मात्र, जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात आले. दरम्यान, त्यांनी २०१५ मध्ये नगरसेवकपदाची निवडणूक पुन्हा लढविली. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांचे सहकारी विजय साळवी यांना उमेदवारी दिली. पक्षाने देवळेकर यांना महापौरपदाची उमेदवारी दिली. १० मे २०१८ ला त्यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. देवळेकर यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत स्मार्ट सिटी शिखर परिषद भरवली गेली. त्यानंतर, केडीएमसीची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाली.

सर्वच पक्षांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध
च्डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी असल्याने येथे आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये माजी महापौर राजेंद्र देवळेकर हे आवर्जून हजेरी लावत असत.
च्डोंबिवलीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या संमेलनाला ५० लाखांचा निधी देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीच्या स्फोटानंतर ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये ते सहभागी झाले होते. अभ्यासू वृत्तीमुळे त्यांचे अन्य राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी मैत्रीचे संबंध होते.
‘थ्री आर’मधून एक ‘आर’ गळाला : राजेंद्र देवळेकर महापौर असताना शिवसेना नगरसेवक रमेश जाधव व राजेश मोरे यांच्यासह त्यांचे समीकरण जुळले होते. त्यामुळे पालिकेत या त्रिकुटाला ‘थ्री आर’ असे नाव पडले होते.

Web Title: Sena corporator, former mayor Devalekar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.