अवघ्या १३० रुपये बिलासाठी कापले ज्येष्ठ नागरिकाचे वीज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:44 AM2021-08-19T04:44:09+5:302021-08-19T04:44:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : अवघे १३० रुपये वीज बिल भरले नाही म्हणून एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचे वीज कनेक्शन ...

Senior citizen's electricity connection cut off for just Rs 130 bill | अवघ्या १३० रुपये बिलासाठी कापले ज्येष्ठ नागरिकाचे वीज कनेक्शन

अवघ्या १३० रुपये बिलासाठी कापले ज्येष्ठ नागरिकाचे वीज कनेक्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : अवघे १३० रुपये वीज बिल भरले नाही म्हणून एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचे वीज कनेक्शन तोडून महावितरणने त्यांचे मीटरदेखील जप्त केले. ज्यांची लाखो, हजारोंची थकबाकी आहे त्यांना अशी वागणूक दिली जाते का, असा सवाल अन्य रहिवाशांकडून केला जात आहे.

मोहन राव, असे त्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून, एमआयडीसी निवासी परिसरामधील स्टर्लिंग पॅलेस आरएच३/१ या सोसायटीत गेल्या अनेक वर्षांपासून ते राहत आहेत. कोरोनामुळे ते दापत्य बहुतेक वेळा आपल्या गावी असते. अधूनमधून ते डोंबिवलीतील घरी येतात.

जुलै महिन्यात त्यांना आलेले १३० रुपयांचे बिल त्यांना गावी असल्याने भरता आले नाही. गेल्या वर्षापासून ते महावितरणकडे वीज बिलापोटी आगाऊ रक्कम भरीत होते. त्यामुळे त्यांचे बिल उणे झीरो येत असे; परंतु यावेळी त्यांना बिलाची आगाऊ रक्कम गावी असल्याने भरता आली नाही. ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा डोंबिवलीतील आपल्या घरी आले तेव्हा घरातील दिवे लागत नसल्याने त्यांची वीज जोडणी कापल्याचे लक्षात आले. त्यांचे वीज मीटरही महावितरणचे कर्मचारी घेऊन गेल्याचे त्यांना दिसले. त्यांनी याबाबत महावितरण, एमआयडीसी कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना ऑगस्ट महिन्याचे व मागील महिन्याचे असे मिळून २४० रुपये बिल आणि रीकनेक्शन चार्जेस असे एकूण ३५४ रुपये भरा, असे सांगण्यात आले. त्यांनी दिनांक १२ ऑगस्ट रोजी ऑनलाइन ही रक्कम भरली. आजपर्यंत त्यांची वीज जोडणी पूर्ववत केली नसल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले.

महावितरणकडे काही जणांची लाखो रुपयांची थकबाकी असताना केवळ १३० रुपये बिल बाकी असताना एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला मानसिक त्रास का सहन करावा लागत आहे. महावितरणकडून एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा तासन्तास खंडित होण्याचे प्रकार होत असून, त्यात सुधारणा करण्याऐवजी प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना त्रास दिल्याबद्दल नागरिकांत मोठा रोष आहे. ते दाम्पत्य पैसे भरूनही वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने त्रासाला कंटाळून पुन्हा आता आपल्या मूळ गावी माघारी गेले. वीजपुरवठा पूर्ववत झाल्यावर सांगा, असे या दाम्पत्याने शेजाऱ्यांना सांगितल्याने त्यांनीही महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून मोहन राव यांचा वीजपुरवठा सुरू करण्याची विनंती केली; परंतु तो अद्यापही सुरू झालेला नाही.

------------------

Web Title: Senior citizen's electricity connection cut off for just Rs 130 bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.