ज्येष्ठ कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:44 AM2020-03-20T02:44:45+5:302020-03-20T02:45:08+5:30

चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेले गोडे हे अतिशय साधे, सरळ आणि विनम्र स्वभावाचे होते. देहदान करण्याच्या अंतिम इच्छेनुसार कुटुंबीयांनी सोपस्कार पूर्ण केले.

Senior poet Dr. Muralidhar Gode passed away | ज्येष्ठ कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे यांचे निधन

ज्येष्ठ कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे यांचे निधन

googlenewsNext

ठाणे - शब्दांचा जादूगार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. डॉ. गोडे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची ५५ वर्षांहून अधिक काळ घट्ट मैत्री होती. देहदान करण्याच्या अंतिम इच्छेनुसार कुटुंबीयांनी सोपस्कार पूर्ण केले. चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेले गोडे हे अतिशय साधे, सरळ आणि विनम्र स्वभावाचे होते.

गोडे हे मूळचे ठाण्यातले. त्यांचा जन्म १८ जून १९३७ रोजी झाला. पाचवीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत आणि नंतर मो.ह. विद्यालयात झाले. पुढे वडिलांच्या नोकरीमुळे त्यांना महाड येथे जावे लागले. तिथेच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. ठाण्यात परतल्यावर पुढचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रु ईया आणि सिद्धार्थ कॉलेजमधून पूर्ण केले. संस्कृत विषय घेऊन एम.ए, बी.एड करून प्रौढ शिक्षण (अ‍ॅडल्ट एज्युकेशन) यावर त्यांनी पीएच.डी. मिळवली आणि शिक्षण क्षेत्रावर आपले प्रभुत्व सिद्ध केले. ‘टीच वन टीच वन’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. मुंबई विद्यापीठात त्यांनी प्रौढ शिक्षण कार्यक्र म म्हणून २० वर्षे प्राध्यापकाची नोकरी केली. पत्रकारिता, साहित्य क्षेत्र, सिनेसृष्टी, नाटक, रंगभूमी, समाजकारण अशा विविध क्षेत्रांत ते मुशाफिरी करू लागले. १९९६ ते १९९९ या कालावधीत कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा लाभलेले गोडे हे महाराष्ट्र राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष होते. याच काळात साक्षरतेसाठी अनेक पुस्तकांचे लिखाण, अभ्यासपूर्ण लेख, मार्गदर्शिका, पथनाट्ये त्यांच्याकडून साकारली गेली. त्यातील दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. पुढे मुंबई आकाशवाणीसाठी शंभरहून अधिक रचना वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रसारित झाल्या आणि दूरदर्शनसाठी जवळजवळ १०० उत्तमोत्तम संहिता, तर काही शीर्षकगीतेही लिहिली. आतापर्यंत त्यांनी १५ अनुबोधपटांचे लेखन केले आणि सुमारे २० लघुपटांचे लेखन राज्य शासनाकरिता केले होते. टीव्ही आणि आकाशवाणीसाठी त्यांनी तब्बल पन्नासच्यावर सुंदर जिंगल्स लिहिली आहेत.

१९७७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बन्या बापू’ या मराठी चित्रपटाची सर्व गीते प्रचंड गाजली. ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी’, ‘मी कशाला आरशात पाहू गं...’, ‘अरे ले लो भाई चिवडा लेलो’, ‘हे गर्द निळे मेघ, बिलगून जशी वीज’ ही चार गाणी उषा मंगेशकर, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल यांनी गायलेली, तर संगीत दिले होते ऋषी-राज या संगीतकाराने. त्यांनी आजवर एकूण १४ चित्रपटांसाठी गाणी लिहिली. 

अगदी अलीकडेच म्हणजे किरण नाकती दिग्दर्शित सिंड्रेला आणि आगामी ढोलताशा चित्रपटासाठी मुरलीधर गोडे यांनी गाणी लिहिली आहेत. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.ठाणे महानगरपालिकेचा ठाणे नगररत्न पुरस्कार, जागतिक वृद्ध दिन पुरस्कार, स्वातंत्र्यवीर वि.दा सावरकर पुरस्कार, कºहाडे समाजभूषण पुरस्कारासह युनिसेफच्या स्पर्धेत उत्कृष्ट पथनाट्याचा पुरस्कार त्यांना मिळाला.
व्यास क्रि एशन्सने २०१० साली प्रकाशित केलेल्या १०० पुस्तकांच्या बालखजिना संचासाठी त्यांनी शीर्षकगीत लिहून दिले होते. व्यास क्रि एशन्सने प्रकाशित केलेली काही पुस्तके त्यांनी संपादित केली होती.

मराठी साहित्यासाठी मोठे योगदान
ठाणे : ज्येष्ठ कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे यांचे गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी जवळचे संबंध असलेल्या गोडे यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली.
ठाण्यातील नौपाडा भागातील भास्कर कॉलनीतील निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मान्यवरांनी गर्दी केली. त्यांचे जवळचे मित्र माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हेदेखील त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी ठाण्यात आले होते. ५५ वर्षांची मैत्री तुटल्याच्या शोकसंवेदना जोशी यांनी या वेळी व्यक्त केल्या. जोशींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गोडे यांच्या निधनावर शोकसंवेदना व्यक्त केल्या.

अभिनय कट्ट्यावर गोडे यांची पंच्याहत्तरी साजरी केली होती. मराठी भाषेबद्दल त्यांना अतिशय प्रेम होते. ते आवर्जून कट्ट्यावर उपस्थित राहत. सिंड्रेला चित्रपटासाठी त्यांनी ‘दिलाची राणी आली’ हे गाणे लिहिले होते.
- किरण नाकती, दिग्दर्शक

व्यासच्या अनेक कार्यक्र मांना ते आवर्जून उपस्थित राहायचे. ज्येष्ठ महोत्सवामध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. २०१७ मध्ये व्यास क्रि एशन्सने गोडे यांना कृतार्थ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. स्वभावाने अतिशय साधे, विनम्र, मितभाषी असे डॉ. गोडे आपल्यात नाहीत. मात्र, मराठी साहित्य विश्वात त्यांचे योगदान कुणालाही विसरता येणे शक्य नाही.
- नीलेश गायकवाड, प्रकाशक

माझी आणि त्यांची ७० वर्षे जुनी मैत्री होती. शाळा, महाविद्यालयात एकत्र होतो, सहलेखक होतो. ठाण्यात शिक्षक म्हणून काम कर, असा मी आग्रह धरला आणि डॉ. बेडेकर विद्यामंदिरमध्ये दोन वर्षे त्यांनी नोकरी केली. रक्तापेक्षा घट्ट नाते आमचे होते. मी, मनोहर जोशी आणि डॉ. गोडे महिन्यातून एकदा लोणावळा किंवा कोकणात फिरायला जायचो.
- प्रा. अशोक चिटणीस, ज्येष्ठ लेखक

गोडे सरांनी साहित्य विश्वाला भरभरून दिलेलं आहे. गेल्या महिन्यातच त्यांना भेटण्याचा योग आला होता. आजारपणामुळे अंथरूणावर असूनही गप्पा झाल्या होत्या. शांत स्वभाव असलेल्या सरांकडून शिकण्यासारखं खूप होतं. - रामदास खरे, लेखक

Web Title: Senior poet Dr. Muralidhar Gode passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.