डोंबिवली : पूर्वेतील सागर्ली गावात साईराज लॉजिंग ॲण्ड बोर्डिंगमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा ठाणे ॲण्टी ह्युमन ट्रॅफिक सेलने सोमवारी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत लॉजचा व्यवस्थापक, चार वेटर आणि तरुणी पुरविणाऱ्या एका दलालास अटक करून स्थानिक टिळकनगर पोलिसांच्या हवाली केले, तर चार तरुणींची सुटका करून त्यांना उल्हासनगरमधील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, आपल्या हद्दीत सुरू असलेल्या अनैतिक धंद्यांबाबत स्थानिक पोलीस अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
साईराज लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती ॲण्टी ह्युमन ट्रॅफिक सेलचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यामुळे लॉजवर बोगस गिऱ्हाईक पाठवून त्या माहितीची खात्री करण्यात आली. वस्तुस्थिती दिसून येताच सोमवारी दुपारी कडलग यांच्या पथकाने लॉजवर अचानक छापा टाकला. यावेळी तेथे चार तरुणी वेश्या व्यवसाय करताना आढळून आल्या. त्यांची तेथून सुटका करीत त्यांना महिला सुधारगृहात पाठवून दिले. या कारवाईत स्थानिक टिळकनगर पोलिसांची मदत घेतली.
डोंबिवलीत याआधीही ॲण्टी ह्युमन ट्रॅफिक सेलने एका इमारतीत चालू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता. आपल्या हद्दीत सुरू असलेल्या अनैतिक धंद्यांवर कारवाईची अपेक्षा स्थानिक पोलिसांकडून असताना त्याकडे होत असलेले दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, सोमवारी लॉजवर झालेल्या कारवाईच्या दरम्यान लॉजचालक आणि आणखी एक दलाल पसार झाले असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
----------------