ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेने शहापूर तालुक्याची टंचाईग्रस्त जिल्हा ही ओळख कायमस्वरूपी पुसण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी गुरुत्वाकर्षणावर आधारित पाणीयोजनेच्या अंतिम आराखड्याचे नुकतेच सादरीकरण राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांसमोर करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत नाशिकमधील भावली धरणातील पाणी आणण्यासाठी १९१.४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी ४ वर्षांचा कालावधी लागणार आहे. प्रस्तावित पाणीपुरवठा योजना ग्रीड स्वरूपाची असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शहापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे तेथे दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ही बाब लक्षात घेऊन येथील टंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्या संकल्पनेतून गुरुत्वाकर्षणावर आधारित शहापूर नळपाणीपुरवठा ग्रीड या योजनेने आकार घेतला आहे. योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामधील भावली धरणात पाणी आणण्यात येणार आहे. या योजनेवर गेल्या आठ महिन्यांपासून काम सुरू होते. अखेर, त्या योजनेचे काम पूर्ण झाले असून, अंतिम आराखडा तयार झाल्यावर राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांकडे या योजनेचे नुकतेच सादरीकरण केले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेने प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला. यानुसार, चार झोन तयार केले असून, पाणीपुरवठ्याचे जाळे निर्माण केले जाणार आहे.या योजनेची क्षमता प्रतिदिन ३५ दशलक्ष लीटर असणार असून, दरडोई ७० लीटर पाणी मिळणार आहे. तर, व्यापारीवापरासाठी २०१२मध्ये ४.५ दलली प्रतिदिन, तर २०१५मध्ये १२ दलली प्रतिदिन पाणीसाठा उपलब्ध होऊ शकणार आहे. (प्रतिनिधी)