शरद पवार यांचे घर तटकरेंनी फोडले; आव्हाडांचा आरोप, राष्ट्रवादीचाही पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 08:26 AM2024-04-09T08:26:00+5:302024-04-09T08:26:32+5:30
देश वाचवायचा असेल तर सत्ताबदल होणे आवश्यक आहे. तसेच भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता देऊन भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शरद पवारांचे घर सुनील तटकरे यांनी फोडले, असा आरोप शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केला. सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी आजही महाराष्ट्र विसरलेला नाही, असे आवाहनही ठाण्यात आयोजित शिमगोत्सवात त्यांनी कोकणवासीयांना केले.
देश वाचवायचा असेल तर सत्ताबदल होणे आवश्यक आहे. तसेच भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता देऊन भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. कळवा येथील भूमिपुत्र मैदान, खारलँड - कळवा येथे कोकणचा शिमगोत्सव व पालखी नृत्य स्पर्धा झाली. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनीही त्यास हजेरी लावली. सुनील तटकरे हे कायम अजित पवारांच्या कानात सांगायचे काम करतात. तटकरे स्वतः आमदार-मंत्री, मुलगा-मुलगी-पुतण्या-भाऊ हेही आमदार अशा पाच जणांना शरद पवार यांनी पदं दिली. एवढी पदं मिळालेले महाराष्ट्रातील घराणे सांगा? असे ते म्हणाले.
ठाणे : जितेंद्र आव्हाड हे सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे असून, ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले असल्याचा आरोप अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सोमवारी केला. सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी महाराष्ट्र विसरलेला नाही, अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर केली होती.
आव्हाडांनी केलेल्या टीकेला परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. परांजपे म्हणाले, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध करतो. शरद पवारांना आव्हाडांनी विचारावे की, २०१४ चा निकाल येण्याआधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायला कोणी सांगितला? शरद पवार यांना कायम खोटेनाटे सांगण्याचे काम आव्हाड यांनी केले. भिवंडीची जागा हट्टापायी घेतली असून, आता त्या जागेवर उमेदवार कसा निवडून येईल याची काळजी आव्हाड यांनी करावी, असे ते म्हणाले.