स्थायी समिती सदस्य निवडीनंतर शिवसेना नगरसेवकांनी घातला गोंधळ; उल्हासनगर महापालिका महासभा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 07:04 PM2020-10-12T19:04:32+5:302020-10-12T19:04:38+5:30
महासभेत झालेल्या गोंधळाचा मुद्दा पुढे करीत पीठासिन अधिकारी भगवान भालेराव यांनी महापालिका महासभा स्थगित केली.
उल्हासनगर : स्थायी व विशेष समिती सदस्य निवडीसाठी बोलाविण्यात आलेली स्थगित विशेष महासभेत स्थायी समिती सदस्याची निवड होताच शिवसेनेने जाणीवपुर्वक गोंधळ घातल्याने, पिठासिन अधिकाऱ्यांनी महासभा अनिश्चित काळासाठी स्थगित केली. भाजप नगरसेवकांनी याचा जाब विचारत लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करून आयुक्ताची भेट घेतली.
स्थगित केलेली महापालिकेची विशेष महासभा सोमवारी दुपारी ४ वाजता ऑनलाईन सुरू होताच, सुरवातीला स्थायी समिती सदस्याची निवड करण्यात आली. भाजपच्या अर्चना करणकाळ, कंचन लुंड, जया माखिजा, कविता पंजाबी, राजू जग्यासी व राजेश वधारिया तर शिवसेनेकडून चंद्रशेखर यादव व कुळवंतसिंग सोहंतो यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड झाली. यानंतर एकून ९ विशेष समिती सदस्याची निवड होणार होती. दरम्यान शिवसेना नगरसेवकांनी उत्तरप्रदेश येथील हाथरत हत्याकांडाचा प्रश्न उठवीत अचानक गोंधळ घातला.
महासभेत झालेल्या गोंधळाचा मुद्दा पुढे करीत पीठासिन अधिकारी भगवान भालेराव यांनी महापालिका महासभा स्थगित केली. स्थगित विशेष महासभेत कोरम पूर्ण असताना पुन्हा स्थगित करता येत नाही. अशी भूमिका भाजपचे गटनेते जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक मनोज लासी, प्रदीप रामचंदानी, राजू जग्यासी, शेरी लुंड आदी नगरसेवकांनी घेवून महासभेत धाव घेवून गोंघळ घातला. शिवसेनेने लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी करून आयुक्त डॉ राजा दयानिधी यांची भेट घेतली. तसेच नगरविकास विभागाला याबाबत तक्रार करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे संकेत भाजप नगरसेवकांनी दिले.
महापालिकेवर शिवसेना व मित्र पक्षाची सत्ता असलीतरी, महासभेत भाजपचे बहुमत आहे. महापौर निवडणुकीत भाजपतील नाराज ओमी कलानी समर्थक एकून १० नगरसेवकांनी भाजप उमेदवार ऐवजी शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान केल्याने, अशान महापौर पदी निवडून आल्या. दरम्यान स्थायी व विशेष समिती सदस्य निवडीचे आदेश शासनाचे दिल्यावर महापौर लीलाबाई अशान यांनी विशेष महासभा गेल्या महिन्यात बोलाविली होती. स्थायी व विशेष समिती मध्ये नगरसेवकांच्या संख्येनुसार भाजपचे बहुमत राहणार असल्याने, सत्तेच्या वाट्या साठी ओमी टीम समर्थक नगरसेवक पुन्हा भाजपकडे गेले. स्थायीसह विशेष समिती सभापती भाजपकडे जाणार यातूनच पिठासिन अधिकारी यांनी अनिश्चित काळासाठी बोलाविलेली विशेष महासभा स्थगित केली होती. तर सोमवारी बोलाविलेल्या महासभेत स्थायी समिती सदस्याची निवड होताच गोंधळाचे कारण पुढे करून महासभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याने, ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांची निराशा झाली आहे.
ओमी कलानी यांची अप्रत्यक्ष कोंडी?
भाजपने स्थायी ऐवजी विशेष समिती मध्ये सत्तेतील वाटा देण्याचे वचन ओमी कलानी यांना दिले होते. प्रत्यक्षात स्थायी समिती सदस्याची निवड झाल्यावर विशेष समिती सदस्य निवडी वेळी गोंधळ घालून सभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची योजना शिवसेनेकडून ठरल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. याला भाजपच्या काही नगरसेवकांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे बोलले जाते. यामागे ओमी कलानी यांची अप्रत्यक्ष राजकीय कोंडी करण्याचा उद्देश भाजप व शिवसेनेचा असल्याचे बोलले जात आहे.