नाईकांच्या खांद्यावरून शिवसेनेवर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 12:57 AM2019-09-15T00:57:26+5:302019-09-15T00:57:50+5:30
राष्ट्रवादीचे नवी मुंबईच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील मातब्बर नेते गणेश नाईक यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
- नारायण जाधव
राष्ट्रवादीचे नवी मुंबईच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील मातब्बर नेते गणेश नाईक यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नाईक यांच्यासमवेत नवी मुंबई महापालिकेतील ४२ नगरसेवकही भाजपत आल्याने निवडणूक न लढताच राज्यातील आणखी एक महत्त्वाची महापालिका भाजपच्या ताब्यात आली. शिवाय, गणेश नाईक यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या दादागिरीला मोडून काढणारा मोठा नेता भाजपला मिळाला आहे. यामुळे येत्या काळात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपला सुगीचे दिवस येण्याची चिन्हे आहेत. किंबहुना, भाजपकरिता कठीण असलेल्या ठाणे जिल्ह्यात पक्षाला ‘अच्छे दिन’ पाहण्याची संधी मिळाली आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईखालोखाल दरडोई उत्पन्न असणारा आणि देशातील सर्वाधिक नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण झालेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. या जिल्ह्यात सात महापालिका, दोन नगरपालिका, आठ ते दहा एमआयडीसी आहेत. शिवाय, सत्तासोपानासाठी आवश्यक संख्याबळ गाठण्यासाठी विधानसभेच्या १८ जागा आहेत. नजीकच्या पालघर जिल्ह्यातील आठ आणि रायगड जिल्ह्यातील आठ जागा महत्त्वाच्या आहेत. सध्या यापैकी शिवसेनेकडे सहा आणि भाजपकडे सहयोगी सदस्य धरून आठ जागा असून चार राष्ट्रवादीचे आमदार होते. यापैकी नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी आधीच राजीनामा देऊन कमळ हाती घेतले आहे. तसेच शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुंरग बरोरा हे शिवसेनावासी झाले आहेत. सध्या मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी हेच राष्ट्रवादीत आहेत. परंतु, आव्हाड सोडले तर सध्या राष्ट्रवादीकडे मातब्बर चेहरा नाही. काँगे्रसची शकले झाली आहेत.
शिवसेनेच्या ताब्यात सध्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या तीन महापालिकांसह अंबरनाथ-बदलापूर या नगरपालिका आहेत. भिवंडीत काँगे्रससोबत ती सत्तेत आहे. मात्र, केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपची सत्ता यापैकी कुठेच नाही. परंतु, आता नाईकांच्या रूपाने नवी मुंबईसारखी महत्त्वाची महापालिका निवडणूक न लढवताही भाजपकडे येणार आहे. शिवाय, ठाणे जिल्ह्यासह पालघर आणि रायगडच्या उरण-पनवेल आणि कर्जत खालापूर परिसरात नाईक यांचे अनेक समर्थक आहेत. यामुळे त्याठिकाणीही अप्रत्यक्ष का होईना भाजपला नाईकांच्या ताकदीचा फायदा घेता येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरचे कलानी कुटुंब, वसई-विरारचे ठाकूर कुटुंबाशी त्यांंची जवळीक आहे. युनियनमुळे ते डोंबिवली, अंबरनाथ, मुरबाड, रसायनी, पाताळगंगा, बोईसर, तारापूरपर्यंत आधीच लोकप्रिय होते.
त्याचाही लाभ जसा शिवसेना आणि राष्ट्रवादीला झाला, तसा आता भाजपला होऊ शकतो. पुढच्या महापालिका निवडणुकीत नवी मुंबईप्रमाणेच ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर महापालिकेत कमळ फुलू शकते. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्या काळात जनसंघ जसा जिल्ह्यात फोफावला होता. तसा तो पुन्हा फोफावण्याची संधी आहे. यातून आनंद दिघे यांनी संपवलेली जनसंघाची पाळेमुळे आता पुन्हा ठाणे जिल्ह्यात मूळ धरू शकतात. मात्र, भाजप त्यांना कितपत स्वातंत्र्य देते अन् गणेश नाईकही आपल्या काही तत्त्वांना, घराणेशाहीला कितपत मुरड घालतात, यावर त्यांचे यशापयश अवलंबून राहणार आहे.
>एक कोटीच्या देणगीमुळे मुख्यमंत्रीपद हुकले
गणेश नाईक यांचा आजपर्यंत प्रवास मोठा रंजक राहिला आहे. ऐंशीच्या दशकात ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यात येणाऱ्या विविध कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी ते झगडत होते. त्यातूनच ते शिवसेनेकडे आकर्षिले गेले. पुढे त्यांनी श्रमिकसेना या कामगार संघटनेची पाळेमुळे सर्वदूर रोवली. ३५० पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये श्रमिकसेनेचा भगवा फडकला. यात रायगड जिल्ह्यातील रिलायन्ससारख्या कंपनीचाही समावेश आहे. यामुळे ते धीरूभाई अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या अधिक जवळ गेले. यात त्यांना स्व. साबीरभाई शेख यांचीही साथ मिळाली. कामगार नेते म्हणून त्यांच्यावर स्व. बाळासाहेबांची नजर पडली. ते बाळासाहेबांचे लाडके सैनिक झाले. मात्र, ९० ते ९५ दरम्यान शिवसेना भवनातील एका बैठकीत बाळासाहेबांनी पक्ष चालवण्यासाठी पक्ष निधीची गरज बोलून दाखवली. तेव्हा पुढे बसलेल्या आणि विधिमंडळ, मुंबई महापालिकेत महत्त्वाची पदे भूषविलेल्या मनोहर जोशी, छगन भुजबळ, स्व. प्रमोद नवलकर यांच्यासारख्या नेत्यांनी एक ते पाच लाखांची रक्कम देऊ केली. त्यावेळी मागे बसलेल्या आमदार गणेश नाईकांनी डायरेक्ट एक कोटींची रक्कम सांगितल्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. नाईकांविरोधात मोहीम राबवण्याची मुहूर्तमेढ त्याचवेळी रोवली गेली. मात्र, त्याची तमा न बाळगता नाईकांनी आपल्या युनियनच्या माध्यमातून एक कोटी रुपये शिवसेनेला गोळा करून दिले. एवढेच नव्हे तर बाळासाहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ६० रुग्णवाहिका वाटण्याचा संकल्प सोडून पहिल्या टप्प्यात राज्यातील विविध भागांत देण्यासाठी ४४ रुग्णवाहिकांचे लोकार्पण बाळासाहेबांच्या हस्ते केले. १९९२-९३ च्या दंगलीत मुंबई जळत असताना तिची जुळी बहीण समजली जाणारी नवी मुंबई मात्र शांत होती. इकडे अनेक मुस्लिमबांधव बिनधास्तपणे रस्त्यांवर नमाज पढत होते. याचे श्रेय गणेश नाईकांनाच जाते. यामुळे ठाण्यातील एका शिवसेना नेत्याने त्याकाळी त्यांना बांगड्यांचा आहेर पाठविल्याची वदंता आहे. मात्र, भिवंडी, राबोडी, मुंब्रा यासारख्या मुस्लिमबहुल पट्ट्यातही नाईक लोकप्रिय झाले. यानंतर मात्र, शिवसेनेतील ज्येष्ठांकडून त्यांची नाकेबंदी सुरू झाली. बाळासाहेबांचे कान फुंकण्यात ही मंडळी आघाडीवर होती. याच दरम्यान शिवसेनेत मोठी फूट पडली. छगन भुजबळ काही ओबीसी आमदारांना घेऊन बाहेर पडले. मात्र, ओबीसी असलेल्या गणेश नाईकांनी बाळासाहेबांवरील श्रद्धेपोटी शिवसेनेतच राहणे पसंत केले. त्यामुळे बाळासाहेबांनी त्यांची गटनेता म्हणून निवड केली. ही बाब बाळासाहेबांंच्या अवतीभोवती फिरणाºया नेत्यांना खटकली. त्यांनी गणेश नाईकांविरोधात कान भरण्याची मोहीम तीव्र केली. 1995साली युतीची सत्ता आली, तेव्हा गटनेते असलेल्या नाईकांकडे नेतृत्व येईल, असे वाटले होते. मात्र, कान भरणाºयांचा हेतू साध्य झाला. नाईकांकडे नेतृत्व सोडाच परंतु, त्यांचा मंत्रिमंडळातही समावेश झाला नाही. नंतर त्यांना वनमंत्री हे दु्य्यम खाते देण्यात आले. मात्र, तो अपमान नाईक यांनी पचवला. परंतु, त्यांच्या विरोधकांचे समाधान झाले नव्हते. महापालिकेत सत्ता असून त्यांची कोंडी होऊ लागली. त्यांना बाळासाहेबांनी राजीनामा देण्यास सांगितले. तेव्हा मात्र नाईकांच्या संयमाचा बांध फुटून त्यांनी थेट माझी चूक काय आहे, ते आधी सांगा, मगच राजीनामा देतो, असे थेट आव्हान बाळासाहेबांना दिले. बाळासाहेबांना असे आव्हान पहिल्यांदाच कुणीतरी दिले होते. यामुळे त्यांची मंत्रिमंडळाकडून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी हकालपट्टी केली. हीच संधी साधून चाणाक्ष शरद पवार यांनी गणेश नाईकांना सन्मानाने राष्ट्रवादीत बोलावले. तेव्हापासून त्यांनी राज्य मंत्रिमंडळात वने, पर्यावरण, कामगार, उत्पादन शुल्क अशी अनेक खाती सांभाळली. या काळात राष्ट्रवादी पक्षाला सर्वाधिक निधी देणारा नेता म्हणून ओळख जपली. मात्र, तरीही त्यांचे ‘मातोश्री’सह सर्वपक्षीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. मोदीलाटेत २०१४ साली त्यांचा बेलापूर मतदारसंघातून पराभव झाला. तेव्हापासून ते विजनवासात गेले होते.
>प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवरून घेरण्याचा प्रयत्न
भाजपप्रवेशावेळी १५ वर्षे सत्तेत राहून आपणास नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न सोडवता आला नसल्याची खंत व्यक्त केली. त्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे गणेश नाईकांनी सांगितले. त्यांच्या कबुलीजबाबाला पकडून विरोधकांनी त्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. मंदा म्हात्रे या केवळ पाच वर्षे बेलापूरच्या आमदार असतानाही त्यांनी हा विषय लावून धरला असून त्यांनी प्रॉपर्टीकार्डवाटपात यश मिळवले आहे. शिवाय, त्यांच्या घरांचा सर्व्हे सुरू केला असून बेलापूर येथील गावठाणात क्लस्टरद्वारे विकासाला हिरवा कंदील मिळवला आहे. यामुळे नाईकांना मंत्री असूनही का जमले नाही, असा प्रचार आता भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे.
>ऐरोली-बेलापूरच्या उमेदवारीचा पेच
बेलापूर मतदारसंघातून सध्या भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. यात मरीना, प्रकल्पग्रस्तांना प्रॉपर्टीकार्डचे वाटप, त्यांचे प्रलंबित प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न त्यांनी लावून धरला आहे. म्हात्रे याही आगरी समाजाच्या असून पक्षाच्या ओबीसी आमदार आहेत. ठाणे जिल्ह्यातील ओबीसी महिला प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली छाप पाडली आहे. यामुळे त्यांची उमेदवारी डावलून भाजपश्रेष्ठी नाईकांना उमेदवारी देतील