उल्हासनगर विकासासाठी शिवसेना-साई पक्ष एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:45 AM2021-09-06T04:45:20+5:302021-09-06T04:45:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांनी साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांची त्यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांनी साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. शहर विकासासाठी शिवसेना-साई पक्ष एकत्र असल्याची प्रतिक्रिया खासदार शिंदे यांनी पत्रकारांना दिली.
उल्हासनगर सत्ताकारणात स्थानिक साई पक्षाने गेल्या तीन महापालिका निवडणुकीत किंगमेकरची भूमिका वठविली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत साई पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले. त्यांच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका वठविणाऱ्या साई पक्षाला सोबत घेण्यासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला. रविवारी सायंकाळी ५ वाजता शिंदे यांनी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरींसह साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी दोघांनी शहर विकासासाठी शिवसेना-साई पक्ष एकत्र असल्याची प्रतिक्रिया दिली.
उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना मित्र पक्षाची सत्ता असून साई पक्ष हा शिवसेनेसोबत गेल्यास पक्षाची ताकद वाढणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. यापुढे दोन्ही पक्ष शहरविकासासाठी एकत्र राहणार असल्याचे ते म्हणाले. शिवसेना-साई पक्षाच्या चर्चेवेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नगरसेवक तसेच साई पक्षाकडून गटनेते गजानन शेळके, नगरसेवक ज्योती चैनांनी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थिती होते.
-------------
खासदारांनी घेतला ब`डमिंटनचा आनंद
शिवसेना-साई पक्षाची चर्चा झाल्यानंतर, खासदार शिंदे यांनी इंदिरा गांधी गार्डनची पाहणी केली. गार्डनच्या बेडमिंटन कोर्टवर काही तरुण खेळत होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी बेडमिंटन खेळले.