मीरारोड: शास्त्रात व शासनाने देखील पाण्यात विरघळणाऱ्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन केलेले असूनही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या बनवून रासायनिक रंग वापरले जात असल्याने यंदा पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची आवश्यकता आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे . त्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र दिले आहे .
कोरोनामुळे माणसांवर बंधने आली असून संकटकाळ आहे. परंतु एरवी आपली जिवन शैलीमुळे व विविध पद्धतीने होणाऱ्या प्रदूषणामुळे दुरावत चालला निसर्ग व त्यातील प्राणी, पक्षी पुन्हा एकदा उभारी घेतलेले पाहायला मिळतायत. हवेतील व पाण्यातील प्रदूषण कोरोनामुळे थांबले असून पृथ्वी व मानवजातीसाठी या नक्कीच सकारात्मक बाजू आहेत.
कोकणात अगोदरपासून शाडू च्या मातीच्या सुंदर सुबक मुरत्या घडवल्या जातात, पुण्यातही बहुतांश तीच परंपरा आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक किंवा इतर परिसरात आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या बनवण्यावर भर देत असल्याने पीओपी आणि रासायनिक रंगा मुळे तलाव , नदी , खाडी व समुद्र यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन निसर्गाची मोठी हानी होत आहे .
निसर्गाचा समतोल राखण्याची जबाबदारी सर्वच नागरिकांवर आहे . आता सरकारच्या माध्यमातून प्रदूषण विरहित गणेशोत्सव आदी सण साजरे करायची आवश्यकता आहे . या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पीओपी वापर बंद करून शाडू मातीच्या मुर्त्याच बनवण्याचा निर्णय शासनाने घ्यावा अशी मागणी पर्यावरण मंत्री यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे . कागदाच्या लगद्यापासून मोठ्या मुर्त्या आणि शाडूच्या मातीपासून छोट्या मुर्त्या बनवण्याचा निर्णय घेणे जरुरीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे .
ज्या मूर्तिकारांनी अगोदरच पीओपी पासून मुर्त्या बनवल्या आहेत त्या राज्य सरकारने स्वतःकडे घेऊन त्याचा जो मोबदला आहे तो मूर्तिकारांना द्यावा, जेणे करून त्यांचे नुकसान होणार नाही. शाडू मातीच्या मुर्त्या वापरण्यास प्रोत्साहन देण्याचे आदेश पूर्वीच शासनाने न्यायालयाच्या आदेश नंतर जरी केले होते . पण त्याची काटेकोर अमलबजावणी केली गेली नाही अशी आठवण सुद्धा त्यांनी करून दिली आहे .