धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
By जितेंद्र कालेकर | Published: May 5, 2024 11:24 PM2024-05-05T23:24:14+5:302024-05-05T23:25:00+5:30
ठाण्यातील अनेकांना गंडा, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: बीएसयूपी योजनेंतर्गत दहा लाखांमध्ये मानपाड्यातील धर्मवीरनगरमध्ये २८० चौरस फुटांचे घर देतो, अशी बतावणी करीत सुरेश पवार (६१) आणि त्याची पत्नी शीला पवार (५८) या दोघांनी अनेकांची फसवणूक केली. त्यांनी घरांची नोंदणी केल्याचा बनाव करून तब्बल एक कोटी ४८ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी रविवारी दिली.
शिवाईनगरातील श्वेतांबरी गायकवाड (३३) यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार सुरेश आणि शीला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ठाण्यातील मानपाडा, धर्मवीरनगरमध्ये बीएसयूपी योजनेंतर्गत २८० चौरस फुटांची घरे दहा लाख रुपयांमध्ये मिळवून देतो, अशी बतावणी करीत गायकवाड यांच्याकडून २ ऑक्टोबर २०१८ रोजी सारस्वत बँक खात्याचा सहा लाखांचा धनादेश, तर त्यांचे पती रोहन घाग यांच्याकडून ६ ऑक्टोबर २०१८ रोजीचा सहा लाखांचा सारस्वत बँक खात्याचा धनादेश सुरेश याने घेतला. असे १२ लाखांचे धनादेश त्यांच्याकडून पवार याने घेतले. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे ३० ऑक्टोबर २०१९ रोजी त्याने नौपाडयातील सुजाता इंडस्ट्रीजमध्ये रजिस्ट्रेशन केल्याचा बनाव करीत ठाणे पालिकेच्या पैसे भरल्याबाबतच्या बनावट पावत्याही त्याने तयार केल्या.
अशाच प्रकारे त्याने गायकवाड यांच्यासह नागरिकांकडून त्याने अशाच प्रकारे पैसे घेतले. त्यानंतर मार्च २०२० मध्ये लॉकडाउनचे कारण त्याने पुढे केले. लॉकडाउन संपल्यावर तुम्हाला घरे मिळतील, असेही तो म्हणाला. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही पैसे किंवा घरही मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला.
शीला यांच्याकडून अरेरावीची भाषा
कल्याण येथील त्याच्या घरी २१ जानेवारी २०२१ रोजी गायकवाड यांच्यासह काही गुंतवणूकदार गेले. त्यावेळी तुमचे पैसे आम्ही ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. आमच्याकडे तुमचे पैसे नाहीत, तुम्हाला काय करायचे ते करा,’ अशी उलट भाषा शीला यांनी गुंतवणूकदारांना केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार या दाम्पत्याविरुद्ध श्वेतांबरी तसेच इतर गुंतवणूकदारांनी ३ मे रोजी न्यायालयात तक्रार दाखल केली. याची दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने नौपाडा पोलिसांना दिले.