धक्कादायक! परिस्थितीपुढे हतबल झाल्याने तान्हुलीला तिने फेकले रस्त्यावर!
By जितेंद्र कालेकर | Published: October 12, 2020 11:58 PM2020-10-12T23:58:19+5:302020-10-13T00:02:32+5:30
एकीकडे पतीने सोडले. तर दुसरीकडे कोरोनामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे स्वत:ची खासगी नोकरीही गेली. मग जन्मास घातलेल्या मुलीचा सांभाळ कसा करायचा? या आर्थिक विवंचनेतूनच आपल्या अवघ्या चार दिवसांच्या मुलीला खारीगाव येथील मोकळया जागेत एका महिलेने फेकून दिले. कळवा पोलिसांनी कोणताही धागादोरा नसतांना अवघ्या काही तासांमध्येच या २४ वर्षीय महिलेला अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एकीकडे पतीने सोडले. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे स्वत:ची नोकरीही गेली. मग जन्मास घातलेल्या मुलीचा सांभाळ कसा करायचा? या विवंचनेतूनच आपल्या जिवंत मुलीला खारीगाव येथील मोकळया जागेत फेकून देणाऱ्या २४ वर्षीय महिलेचा कळवा पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच शोध घेतल्याची घटना सोमवारी घडली. तिच्या मुलीवर आता उपचार करण्यात येत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ११ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कळवा पूर्व भागातील खारीगाव रेल्वे फाटकाच्या बाजूला असलेल्या उड्डाणपूलाजवळील मोकळया मैदानामध्ये एक सहा ते सात दिवसांची नवजात मुलगी पोलिसांना आढळून आली. सुरुवातीला कोणीतरी अनैतिक प्रकारातून या मुलीला टाकून दिल्याचा संशय होता. त्यामुळे याप्रकरणी कलम ३१७ नुसार अज्ञात पालकाविरुद्ध गुन्हाही दाखल झाला. कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल घोसाळकर, पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश शिरसाठ यांच्या पथकाने कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून मिळालेल्या वर्णनाच्या आधारे परिसरातील अनेक महिलांकडे या नवजात मुलीची चौकशी केली. तेंव्हा डॉक्टरांकडून मिळालेल्या वर्णनाच्या आधारे कळवा परिसरातील एका २४ वर्षीय महिलेचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. वर्षभरापूर्वी एका २७ वर्षीय तरुणाबरोबर पळून जाऊन प्रेमविवाह केला. झारखंडला त्याच्याबरोबर काही महिने राहिल्यानंतर ती गरोदर राहिली. दरम्यान, त्यांच्यात काही कारणांनी वाद झाले. याच वादामुळे त्याने तिला सोडले. दोन महिन्यांपूर्वीच ती कळव्यात पुन्हा आईकडे आली. ८ आॅक्टोंबर रोजी तिने एका मुलीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जन्मही दिला. परंतू, पतीनेही सोडले. त्यात स्वत:चीही वसई येथील खासगी नोकरी लॉकडाऊनमुळे गेली. आता या मुलीचा सांभाळ तरी कसा करायचा? त्यामुळेच तिला एका मोकळया मैदानात टाकल्याची कबूली तिने पोलिसांपुढे दिली. या प्रकरणात पोलिसांनी तिला सोमवारी अटक केली असून तिची कौटुंबिक परिस्थिती जाणून घेतल्यानंतर ठाणे न्यायालयानेही तिची जामीनावर सुटका केली आहे. कोणताही धागादोरा नसतांना केवळ डॉक्टरांनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे कळवा पोलिसांनी या महिलेचा शोध घेतला. तिच्या नवजात बाळाला आता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.