दुकानदार, फेरीवाल्यांमुळे निर्माण झाल्या बेकायदा कचराकुंड्या; स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 07:55 PM2017-11-30T19:55:38+5:302017-11-30T19:56:20+5:30
मीरा रोड - दुकानदारांसह फेरीवाल्यांकडून बेकायदा कचराकुंड्या निर्माण केल्या जात असून, यामुळे अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य अनेक ठिकाणी पसरल्याने स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे.
मीरा रोड - दुकानदारांसह फेरीवाल्यांकडून बेकायदा कचराकुंड्या निर्माण केल्या जात असून, यामुळे अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य अनेक ठिकाणी पसरल्याने स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. बेकायदा कचराकुंड्या निर्माण करणा-या दुकानदार, फेरीवाल्यांसह याकडे दुर्लक्ष करणा-या पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांवर देखील कारवाईची मागणी सत्ताधारी भाजपाच्याच नगरसेवकांकडून होऊ लागली आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेने दैनंदिन साफसफाईसाठी नेमलेल्या ठेकेदाराने घरोघरी जाऊन कचरा उचलणे बंधनकारक आहे. परंतु अनेक भागात घरांमधून वा दुकानदारांकडून कचरा थेट घेतला जात नाही. त्यातच शहरात बसणारे फेरीवाले देखील जाताना कचरा तेथेच टाकून जातात. यामुळे ठिकठिकाणी बेकायदा कचराकुंड्या निर्माण झाल्या असून, कचराकुंडीमुक्त शहराचा पालिकेचा दावा फसवा ठरलाय.
या बेकायदा कचरा कुंड्यांवर उंदीर, घुशी, गुरं - ढोरं, कुत्री - मांजरी, डुक्कर व अन्य पक्ष्यांचा राबता असतो. शिवाय दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे परिसरातील रहिवासी त्रासले आहेत. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. परंतु महापालिका अधिकारी मात्र कामचुकारपणा करणा-या ठेकेदारासह बेकायदा कचराकुंड्या निर्माण करणा-या दुकानदार, फेरीवाले आदींवर कारवाईच करत नाही. त्यामुळे शहरात सर्रास कुठेही कचरा टाकला जात असल्याने उकीरडे निर्माण झाले आहेत.
मीरा रोडच्या प्रभाग १३ मधील भाजपा नगरसेविका अनिता मुखर्जी यांनी देखील महापौर डिंपल मेहतांसह उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, आरोग्य अधिकारी संदीप शिंदे यांना या प्रकरणी लेखी तक्रार केली आहे. दुकानदार, फेरीवाले हे सर्रास कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकत असल्याने शांती विद्या नगरी, गौरव व्हेली, काशी, घोडबंदर, शिफ्टिंग आदी विविध परिसरात जागोजागी बेकायदा कच-याकुंड्या तयार झाल्या आहेत. जेणेकरून सर्वत्र दुर्गंधी व अस्वच्छता पसरल्याने रहिवाशी त्रस्त आहेत.
पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी देखील कचरा टाकणा-या फेरीवाले, दुकानदार यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे अधिका-यांसह फेरीवाले, दुकानदार यांच्यावर कारवाईची मागणी मुखर्जी यांनी केली आहे. सर्व परिसर आधी पालिकेने स्वच्छ करावा व त्यासाठी ठोस कायदेशीर कार्यवाही करावी, असे त्या म्हणाल्या.