नितिन पंडीत
भिवंडी ( दि. ७ ) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना लावलेले निर्बंध ब्रेक द चैन च्या माध्यमातून कमी कमी करीत असताना सर्व व्यवसायिकांसाठी रात्री दहा वाजे पर्यंत सूट दिली असताना , हॉटेल परमिट रुम धारक व्यवसायिकांना सायंकाळी चार वाजे पर्यंत वेळ दिल्याने ती हॉटेल व्यवसायिकांसाठी अन्याय कारक असल्याने भिवंडीत शनिवारी भिवंडी हॉटेल अँड परमिट रुम ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर शेट्टी ,माजी अध्यक्ष सुंदर शेट्टी ,उपाध्यक्ष रामकृष्ण शेट्टी व सरचिटणीस प्रज्वल शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस अनेक हॉटेल व्यवसायिकांनी हजेरी लावली होती. या बैठकीत शासनाने इतर व्यवसायिकां प्रमाणे हॉटेल चालकांना वेळ वाढवून देण्याची मागणी अनेकांनी व्यक्त केली, त्यानंतर धामणकर नाका येथील दीपक हॉटेल बाहेर मूक निदर्शने करण्यात आली आहेत.
परमिट रुम चालकां कडून शासन लायसन्स फी ही आगाऊ वसूल करीत असल्याने त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांवर आर्थिक भुर्दंड पडला असतानाच हॉटेल परमिट रुम मध्ये सायंकाळी सहा नंतर ग्राहक येत असताना त्याच वेळी व्यवसाय बंद ठेवण्यासाठी बंधन घातली जात असून त्यामुळे आधीच अडचणीत आलेला हॉटेल व्यवसायिक मेटाकुटीला आला असल्याची भावना भास्कर शेट्टी यांनी बोलून दाखवली . तर ज्याप्रमाणे राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत या नव्या निर्बंधां मुळे हॉटेल व्यवसायिकांच्या रूपाने नवे शेतकरी निर्माण केले असून आमच्यावर सुध्दा आत्महत्या करण्याची वेळ सरकारने आणली असल्याचा संताप व्यक्त करीत सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू असताना आमच्या वर बंधन लादली जात आहेत हे चुकीचे असल्याचा आरोप सरचिटणीस प्रज्वल शेट्टी यांनी केला आहे .
हॉटेल व्यवसायावर अनेक कुटुंब अवलंबून असल्याने या निर्बंधां मुळे व्यवसायिकांसह कामगारांवर सुध्दा उपासमारीची वेळ आली असल्याची खंत व्यक्त करीत हॉटेल व्यवसायिक कोरोना काळात सर्व नियमांचे पालन करीत आले असून यापुढे ही करणार आहेत. हॉटेल परमिट रुम मध्ये सायंकाळी ६ नंतर ८० टक्के व्यवसाय होत असून त्यावेळी बंद ठेवून दिवसा २० टक्के व्यवसाय करून आम्ही जगायचे कसे असा प्रश्न हॉटेल व्यवसायिकांनी या मूक आंदोलनावेळी उपस्थित केला आहे .