ठाण्यात वीज मीटरच्या दुरुस्तीसाठी लाच घेणाऱ्या मध्यस्थीला सहा महिने कैदेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 10:19 PM2018-05-08T22:19:31+5:302018-05-08T22:33:26+5:30
वीज मीटर नादुरुस्त असल्याने बिलाची वसुली न करण्यासाठी दहा हजार रुपये स्वीकारणा-या मध्यस्थीला सहा महिने कैद आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठाण्याच्या विशेष न्ययालयाने मंगळवारी सुनावली.
ठाणे : वीजमीटर दुरुस्तीसाठी महावितरण कर्मचा-याच्या मदतीने दहा हजारांची लाच स्वीकारणा-या चंपालाल रावल या खासगी व्यक्तीला ठाण्याचे विशेष न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी सहा महिने कैद आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कळव्यातील एका ग्राहकाला जादा वीज बिल आल्यामुळे त्याने कळवा विभागाच्या महावितरण कंपनीकडे २०११ मध्ये तक्रार केली होती. त्यावेळी वरिष्ठ तंत्रज्ञ सोपान घोडके आणि चंपालाल रावल यांनी मीटर नादुरुस्त असल्याने बिलाची वसुली न करण्यासाठी दहा हजार रुपये मागितले होते. ही रक्कम स्वीकारतांना या दोघांनाही २ जानेवारी २०११ रोजी ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, सोपान घोडके यांचे निधन झाल्यामुळे रावल यांच्याविरुद्ध न्यायालयात याप्रकरणी खटला सुरू होता. त्याची सुनावणी मंगळवारी झाली. आरोपी रावल याला भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार सहा महिन्यांची साधी कैद आणि पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा न्या. ताम्हणेकर यांनी सुनावली.
या गुन्ह्याचा तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक दळवी यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून उपअधीक्षक अंजली आंधळे आणि हवालदार साजीद शाह यांनी काम पाहिले. सरकारतर्फे अभियोक्ता म्हणून अॅड. रेखा हिवराळे यांनी बाजू मांडली.