अर्थसंकल्पीय चर्चेत महाविकास आघाडीतील नगरसेवकांमध्ये धूमशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:39 AM2021-02-13T04:39:03+5:302021-02-13T04:39:03+5:30
ठाणे : दोन दिवसांपासून स्थायी समितीत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. मात्र शुक्रवारी ही चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीतील काँग्रेस ...
ठाणे : दोन दिवसांपासून स्थायी समितीत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. मात्र शुक्रवारी ही चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलाच राडा झाला. कॉंग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि शिवसेनेचे नरेश मणेरा यांच्यात शिवीगाळ आणि शाब्दिक चकमकीवरून हे प्रकरण एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकेपर्यंत पोहोचले. सभागृहात महिला सदस्यदेखील उपस्थित आहेत, याचेही भान या बेभान नगरसेवकांना नव्हते. अखेर एरव्ही महाविकास आघाडीला पाण्यात पाहणाऱ्या भाजपने मध्यस्थी करून शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद शमविण्यास मदत केली. या राड्यानंतर ही चर्चा अर्धवट राहिली असून, आता पुढील आठवड्यात पुन्हा अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांत काही ना काही कुरबुरी सुरूच आहेत. ठाण्यातही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये हेच प्रकार सुरू आहेत. एकीकडे आता आम्हाला खऱ्या अर्थाने विरोधी पक्षनेता भेटल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेतेदेखील शिवसेनेवर घसरताना दिसत आहे. या कुरबुरीच्या वातावरणातच शुक्रवारी अर्थसंकल्पावरील चर्चा स्थायी समितीच्या बैठकीत सुरू होती. गुरुवारपासून ही चर्चा सुरू असून शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता पुन्हा ही चर्चा पुढे सरकत होती. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास या चर्चेला अचानक शिवीगाळीचे स्वरूप मिळाले. चर्चा सुरू असताना काँग्रेसचे विक्रांत चव्हाण वारंवार सभागृहात ये-जा करीत होते. त्यांना बोलण्याची संधी मिळाल्यावर २०१८, २०१९ आणि २०२० च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यास सुरुवात केली. परंतु जुने विषय का उगाळता, आताच्या बजेटवर चर्चा करा, अशी मागणी शिवसेनेचे नरेश मणेरा यांनी केली. त्यावर चव्हाण आक्रमक झाले. मला जनतेने निवडून दिले आहे, त्यामुळे मला काय बोलायचे हे शिकवू नये, असा शाब्दिक टोला त्यांनी लगावला आणि येथूनच दोन्ही नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. ही शाब्दिक चकमक अतिशय खालच्या स्तराची होती. सभागृहात महिला सदस्य आणि महिला अधिकारीही आहेत, याचे भान विसरून या नगरसेवक महोदयांनी एकमेकांना शिवीगाळ करण्यात तसूभरही कसूर सोडली नाही. त्यानंतर हा वाद एवढा वाढला की, चव्हाण यांनी मणेरा यांच्या अंगावर थेट खुर्ची फेकण्याचा प्रयत्न केला.
हा राडा सुरू असतानाच भाजपच्या सदस्याने चव्हाण यांच्या हातातील खुर्ची खेचून घेत त्यांना बाहेर नेले. काही वेळाने हा वाद शांत झाला. परंतु तोपर्यंत ही चर्चा थांबविली गेली. आता पुढील आठवड्यात यावर चर्चा होणार आहे. यानंतर या दोघांनी एकमेकांची माफी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
.............................
महापौरांनी दिली तंबी
हे प्रकरण एवढे तापले होते की, महापौर दालनात विक्रांत चव्हाण गेले, तेव्हा त्यांना महापौरांनीही चांगलीच समज दिल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही असे भांडत राहिलात तर महाविकास आघाडीला ते परवडणारे नाही, असेही त्यांनी सांगितले. विरोधकांना यामुळे आयते भांडवल मिळेल. त्यामुळे यापुढे असे होता कामा नये, अशी तंबीही महापौरांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.