भिवंडी : नागाव कासीमपूरा येथील ‘राहत मंजील’ या चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामास लागलेली भीषण आग दुपारी अडीच वाजेपर्यंत धुमसत होती. सकाळी साडेसहा वाजता शॉर्ट सर्कीटमुळे गोदामाला आग लागली, अशी अग्निशमन दलाची प्राथमिक माहिती आहे. तेथील कापड व धाग्याने क्षणार्धात पेट घेतल्याने आगीच्या ज्वाळा व धुराच्या लोटांनी इमारतीला लपेटले. वरील फ्लॅटमध्ये झोपलेले किंवा नुकतेच जागे झालेले सुमारे दीडशे रहिवासी धुराचा त्रास होऊ लागल्याने व आगीचे तांडव पाहून भयभीत झाल्याने इमारतीच्या गच्चीवर जाऊन उभे होते. एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये येण्या-जाण्याकरिता केवळ एकच जिना होता. त्यावर धुराचे साम्राज्य पसरलेले असल्याने कुणालाही बाहेर पडता आले नाही. आग लागल्यानंतर तब्बल एक तासांनी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आग विझवण्याकरिता भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे इतकेच नव्हे तर मुंबईतून अग्निशमन दलाच्या गाड्यांची कुमक मागवण्यात आली. अग्निशामन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून दुपारी १२ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. आगीचे स्वरुप भीषण होते. मात्र अग्निशमन दलाने केलेल्या कामगिरीमुळे प्राणहानी झाली नाही. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संतोष थिटे, मनपा आयुक्त बालाजी खतगावकर,तहसीलदार वैशाली लंभाते व पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे हे हजर होते. (प्रतिनिधी)सहा जण जखमीइमारती शेजारील पत्र्याच्या शेडवर उभे राहून पहिल्या मजल्यावर पाणी मारणारा इश्तेहाक अन्सारी कोसळल्याने त्याच्या पाय -कानाला मार लागून जखमी झाला. गोविंद खांडकर बचावकार्य करताना ज्वाळांची धग लागल्याने तर रहिवासी शकील अन्सारी हे शॉक लागल्याने जखमी झाले. कांतीलाल गुजर हे मदतकार्य करताना पोटात दुखू लागल्याने इस्पितळात दाखल झाले.यासीन अन्सारी व सय्यद हाफिज रेहमान कादरी हे रहिवासी आग लागल्यावर इमारतीमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांत जखमी झाले.आगीचे विधानसभेत पडसादशहरांतील कासीमपूरा भागात लागलेल्या आगीचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. भिवंडी शहराबाहेरून आणलेल्या पाण्याने ही आग विझविली जात असल्याबाबत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी खेद व्यक्त केला. विधानसभेत या आगीकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधून शहरांत आधुनिक अग्निशामक केंद्र उभारण्याची मागणी केली.स्थानिक अग्निशामक दलाकडे आग विझविण्याची योग्य साधने नसल्याने वेळीच ती विझली नाही. तसेच ती विझविण्यासाठी ठाणे व कल्याण येथून पाणी भरलेले बंब बोलविण्यात आले. शहरांत पॉवरलूम व विविध इंडस्ट्रीज आहेत. अशा स्थितीत अत्याधुनिक अग्निशामक केंद्राची उभारणी झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. भिवंडीतील लोकसंख्या व लोकवस्ती जलदगतीने वाढत आहे. त्यानुसार नागरी सुविधा नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. निधी उपलब्ध नसल्याने मनपा निष्क्रिय झाली आहे. त्यामुळे भिवंडी महानगरपालिका तत्काळ बरखास्त झाली पाहिजे, अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली.अग्निशामकदल या ठिकाणी उशिरा आले. टँकरद्वारे पाणी आणून आग विझवित होते. परंतु, आमचे कुटूंब व शेजारी सर्व घाबरलेले होते. तोपर्यंत धुराने इमारतीस वेढले होते. आम्हाला माणसे दिसत नव्हती. तेंव्हा टेरेसवरून वाचविण्यासाठी गोंगाट केला. मोहल्यातील सर्वजणांनी धावून मदत केली.सईद अन्सारी, भाडोत्रीया इमारतीत मी गेल्या दोन वर्षापासून भाड्याने राहतो. सकाळी सात वाजता कारखान्यात जाताना जीना उतरत असताना जीना धूराने भरलेला दिसला. तेव्हा घाबरून घरातल्यांना आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर मिळेल त्या मार्गाने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. आग विझेपर्यंत कुंटुंबास नातेवाईकांकडे पाठविले. -तौहीद अहमद अन्सारी, पॉवरलूम कामगार
अडीचपर्यंत धुमसत होती आग
By admin | Published: April 13, 2016 2:18 AM