... तर तुमचा मनोज शेलार करावा लागेल, शिवसेनेच्या शिक्षण सभापतींना चिठ्ठीतून धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 06:49 PM2021-08-06T18:49:19+5:302021-08-06T19:04:36+5:30
उल्हासनगर महापालिका शाळा इमारतीची दुरावस्था झाली असून एकेकाळी १२ हजारांपेक्षा जास्त असणारी मुलांची पटसंख्या ४ हजारावर आली
उल्हासनगर : महापालिका शाळा बाबत जास्त चौकशी कराल तर, तुमचा मनोज शेलार करावा लागेल, असे धमकीचे पत्र शुक्रवारी शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बहेनवाल यांच्या महापालिका कार्यालयाच्या टेबलखाली मिळाल्याने एकच खळबळ उडाली. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी व शिवसेना नेते धनंजय बोडारे यांनी आक्रमक होत अश्या प्रवृत्तीला ठेचावे लागेल असा इशारा देऊन पालिकेने चौकशी करण्याची मागणी केली.
उल्हासनगर महापालिका शाळा इमारतीची दुरावस्था झाली असून एकेकाळी १२ हजारांपेक्षा जास्त असणारी मुलांची पटसंख्या ४ हजारावर आली. तसेच मुलांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण मंडळात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे पत्र शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बहेनवाल यांनी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना दिले. तशी बातमी शुक्रवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होऊन चर्चेचा विषय बनली. दरम्यान शुक्रवारी शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बहेनवाल ह्या महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेल्या असता, त्यांच्या टेबलच्या काचेखाली एक कागद ठेवल्याचे दिसले. शाळांची जादा चौकशी करालतर , तुमचे मनोज शेलार करावे लागेल. अशी धमकी त्या पत्रात होती.
याप्रकारने हादरलेल्या सभापती शुभांगी बहेनवाल यांनी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे यांना झालेला प्रकार सांगितला. तसेच पोलिसांना याबाबत माहिती दिली, असे त्या म्हणाल्या. राजेंद्र चौधरी व धनंजय बोडारे यांनी महापालिका मुख्यालयात धाव घेऊन शिवसेनेच्या सभापतीला धमकावल्या बाबत नाराजी व्यक्त करून महापालिका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे सभापतींच्या कार्यालयात कोण कोण गेले होते. याचा शोध घेऊन असे भ्याड कृत्य करणाऱ्याला शिवसेना धडा शिकविणार असल्याचा इशारा दिला. एका वर्षांपूर्वी मनसे विध्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी शिक्षण मंडळ बाबतची माहिती मागितली होती. यातून त्यांच्यावर हल्ला होऊन हल्ला करण्याचा मुख्य सूत्रधार महापालिकेचा एक कर्मचारी निघाला होता.
गोरगरीब मुलांसाठी लढणे चुकीचे आहे का?
शहरातील गोरगरीब व गरजू मुले महापालिका शाळेत शिक्षण घेत असून त्यांना सर्व सुखसुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढतो. असे लढणे चुकीचे आहे का? असा प्रश्न शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बहेनवाल यांनी केला. शिक्षण विभागाच्या उपायुक्त प्रियांका राजपूत यांना झालेला प्रकार सांगितला असून त्यांनी प्रशासकीय स्तरावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे बहेनवाल म्हणाल्या.