पानपट्टे यांच्याकडून पदभार जाताच प्लास्टिक विरोधात कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:42 AM2021-07-30T04:42:30+5:302021-07-30T04:42:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : सार्वजनिक आरोग्य विभाग उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्याकडून पदभार काढून घेत तो उपायुक्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड : सार्वजनिक आरोग्य विभाग उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्याकडून पदभार काढून घेत तो उपायुक्त अजित मुठे यांच्याकडे सोपवताच मुठे यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. एकाच दिवसात २२ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून ४० हजारांचा दंड वसूल केला आहे.
काही महिन्यांपूर्वी अतिक्रमणचा पदभार असतानाही उपायुक्त अजित मुठे यांनी प्रभाग तीनमध्ये भाईंदर पूर्व स्टेशनसमोरील प्लास्टिक गोदामावर धाड टाकून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साठा पकडून मोठा दंड वसूल केला होता. सार्वजनिक आरोग्य विभागाचा पदभार मिळताच मुठे यांनी प्लास्टिक विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेश स्वच्छता निरीक्षकांना दिले. त्यानुसार गुरुवारी जनता नगर, गोल्डन नेस्ट, मीरा रोड, कनाकिया, चेणे, उत्तन येथे अनुक्रमे स्वच्छता निरीक्षक प्रकाश पवार, रवींद्र पाटील, शाम चौगुले, मोहन पेडावी, अनिल राठोड, अरविंद चाळके यांनी प्लास्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून २२ किलो प्लास्टिक जप्त केले. यावेळी मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार कांबळे उपस्थित होते. शहर प्लास्टिक मुक्त करण्याच्या दृष्टीने व पर्यावरण संरक्षणासाठी बंदी असलेल्या प्लास्टिकविरुद्ध नियमित कारवाई सुरू राहणार आहे. ज्या स्वच्छता निरीक्षकाच्या कार्यक्षेत्रात प्लास्टिक आढळेल त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल असा इशारा मुठे यांनी दिला आहे.