थुंकीचे पाट, आता बास..! नागरिकांनी स्वच्छतेबाबत पाळावी स्वयंशिस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 01:33 AM2020-03-17T01:33:51+5:302020-03-17T01:37:24+5:30
कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा, असेही आवाहन आता ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ठाणे : रस्त्यावर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे कोणत्याही साथीच्या आजाराचे उगमस्थान. नेमके त्याकडेच सर्व संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकण्याच्या सवयीकडे सामाजिक गुन्हा म्हणून पाहण्याची गरज वैद्यकीय व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. कोरोनासारख्या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वयंशिस्तीने स्वच्छता पाळणे आवश्यक आहे.
कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा, असेही आवाहन आता ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
साथीच्या आजाराचे उगमस्थान हे सार्वजनिक स्थळी थुंकणे हेच आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंशिस्तीने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासोबतच थुंकणे टाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. कोरोनाच्या संकटानंतर पालिकेच्या पथकांद्वारे आठवडाभरात २६१ लोकांवर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याबद्दल कारवाई केली असून २६ हजार १०० रुपयांचा दंड त्यांच्याकडून वसूल केला आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार हे स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या माध्यमातून याकरिता ५० पथके तयार केली आहेत. ही पथके स्टेशन परिसर, रिक्षास्टॅण्ड, रेल्वेस्टेशन परिसर, एसटी स्टॅण्ड आदींसह सर्व १० प्रभाग समिती कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने केवळ एकच आजार होत नाही, तर अनेक आजार हे थुंकण्यामुळेच होत असतात. मात्र, नागरिक जागरूक नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आमच्या संस्थेच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे. परंतु, थुंकणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई अत्यावश्यक आहे.
- डॉ. दिनकर देसाई,
अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे
काय होते नक्की...
पान, गुटखा, मावा या गोष्टींचे सेवन केले, की काही वेळाने थुंकावेच लागते.
गाडी असेल तर गाडीवरूनच मान वाकडी करून थुंकले जाते.
पायी जात असेल तरीही रस्त्याच्या कडेला थुंकले जाते.
पानटपºयांच्या इथे तर दिवसभरात हजारो पिंका टाकल्या जातात.
काहीही खाण्याची सवय नसली तरीही काही जणांना थुंकल्याशिवाय चैन पडत नाही. असे लोक कुठेही थुंकतात. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो.
काय होते थुंकल्यामुळे...
आजारी व्यक्तीच्या थुंकीतील आजार पसरवणारे जंतू मोकळे होतात.
संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वासावाटे ते त्याच्या शरीरात जातात.
ही प्रक्रिया एका नाही तर अनेक व्यक्तींच्या बाबतीत होते.
प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांवर, आधीच आजारी असलेल्यांवर याचा परिणाम लगेच होतो.
जिथे थुंकले त्या परिसरातील धातू किंवा कोणत्याही वस्तूवर जंतू बसतात.
त्याला कोणाचा हात लागला, की ते लगेच कार्यान्वित होतात.
थंड वातावरण, सावली, पाणी अशा गोष्टी जंतूंना जिवंत ठेवतात.
काय करायला हवे...
थुंकताना कोणीही दिसले, की पाहणारे त्याला प्रतिबंध करू शकतात.
थुंकणारा एकच असतो, पाहणारे अनेक; त्यामुळे प्रतिबंध करणे शक्य आहे.
रस्त्यावर थुंकणाºयांना जागेवर आर्थिक किंवा शिक्षेच्या स्वरूपात दंड करणारी यंत्रणा निर्माण करणे.
कारवाईच्या मागे कायद्याचे पाठबळ निर्माण करणे.
सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनी प्रबोधन करणे.
थुंकीबहाद्दरांविरुद्धच्या कारवाईला कायद्याचेही पाठबळ
पानटप-या बंद करण्याची मागणी
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे हा आजार जास्त पसरू शकतो. हा धोका वेळीच ओळखून शहरातील पानटपºयांवर अगोदर बंदची कारवाई करावी, अशी मागणी शुक्रवारी झालेल्या जिल्हाधिकाºयांच्या बैठकीत काही संस्थांनी केली होती. प्रशासनाने याबाबत अद्याप तरी ठोस भूमिका घेतलेली नाही. मात्र आता परिस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासनामार्फत काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ही आहेत सर्वाधिक थुंकण्याची ठिकाणे
राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक अध्यादेश जारी करून त्यांना रस्त्यावर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करणे यासाठी दंड करण्याचा अधिकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचा आढावा घेतला असता, येथील स्टेशन परिसर, रेल्वेस्टेशन, एसटीस्टॅण्ड आणि रिक्षास्टॅण्ड ही सर्वाधिक थुंकण्याची ठिकाणे आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या यंत्रणकेडून या सर्व ठिकाणांवर वॉच ठेवला जाणार असून, थुंकणाºयांवर कारवाईही केली जाणार आहे.
विविध माध्यमातून जनजागृती
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यासाठी पालिकेने आता पोस्टर, हॅण्डबिल आदींद्वारे जनजागृती सुरू केली आहे. या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास त्याचे आरोग्यावर कसे विपरित परिणाम होऊ शकतात, हेच अधोरेखित करण्यात आले आहे. मात्र तरीही सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करणाºयांवर त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे जनजागृती आणखी प्रभावी पद्धतीने करण्याची गरज आहे.
गतवर्षी पाच लाखांची वसुली
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांवर कारवाई करण्यासाठी पालिकेची ५0 पथके असून, त्यांनी वर्षभरात ५६९ लोकांवर कारवाई करुन पाच लाख ६० हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा विभागामार्फत देण्यात आली आहे. दरम्यान, आता कोरोनोचा पहिला रुग्ण ठाण्यात आढळल्यानंतर पालिकेने कठोर उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. स्टेशन परिसर, एसटीस्टॅण्ड, रिक्षास्टॅण्ड या महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त तीन ते चार पथके तैनात करण्यात आली आहेत. यातील प्रत्येक पथकामध्ये पाच ते सात जणांचा कर्मचारीवर्ग आहे. या पथकामार्फत रस्त्यावर थुंकण्यावर कारवाई केली जात आहे.
काय आहे कायदा?
सार्वजनिक ठिकाणी होणाºया अस्वच्छतेचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने मागील वर्षी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक अध्यादेश जारी केला. त्यानुसार, रस्त्यावर थुंकणाºयांकडून १०० रुपये वसूल केले जात आहेत. ही कारवाई करण्यासाठी पालिकेने ५0 पथकांची निर्मिती केली आहे. या पथकांमार्फत नियमीत स्वरुपात कारवाई केली जाते. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आणखी जोमाने सुरू केली आहे.
- अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, घनकचरा विभाग, ठाणे महानगरपालिका