ठाणे : स्पोर्टींग क्लब कमिटीने डोंबिवली क्रिकेट क्लबवर सहा धावांनी निसटता विजय मिळवत मुंबई क्रिकेट संघटना आयोजित महिला बाद पद्धतीच्या डॉ कांगा क्रिकेट स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली. ध्रुवी पटेलच्या अर्धशतकी खेळीमुळे ३५ षटकात ८ बाद १८० धावा उभारल्यावर स्पोर्टींग क्लब कमिटीच्या गोलंदाजांनी डोंबिवली क्रिकेट क्लबला ५ बाद १७४ धावांवर रोखत अंतिम फेरीच्या दिशेने आगेकूच कायम राखली.
नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करताना स्पोर्टींग क्लब कमिटीची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीची जोडी अवघ्या १५ धावांत माघारी परतल्यावर ध्रुवी पटेलने ५४ धावा करत संघाला सुस्थितीत नेले. तन्वी चव्हाणने नाबाद २४ आणि प्रणाली मळेकरने ११ धावांची खेळी केली. प्रीती चौधरी आणि सानिका खैरनारने प्रत्येकी दोन बळी मिळवले. दिक्षा दुबे, सायली भालेराव, ध्रुवी कापडणेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. उत्तरादाखल लावण्या शेट्टीने अर्धशतक झळकवत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण इतर फलंदाजांनी अपेक्षेनुसार कामगीरी न केल्याने डोंबिवली क्रिकेट क्लबला पराभव पत्करावा लागला. लावण्याने ६४ आणि सायली भालेरावने ३९ धावा केल्या. अभिगील नाईक, वैष्णवी पालन, आर्या कानडे, स्वरा दिवेकर आणि अंजु सिंगने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
संक्षिप्त धावफलक : स्पोर्टींग क्लब कमिटी : ३५ षटकात ८ बाद १८० (ध्रुवी पटेल ५४, तन्वी चव्हाण नाबाद २४, प्रणाली मळेकर ११, प्रिती चौधरी ५-३७-२, सानिका खैरनार ६-३०-२, दिक्षा दुबे ४-२३-१, सायली भालेराव ६-३४-१, ध्रुवी कापडणे ७-२६-१) विजयी विरुद्ध डोंबिवली क्रिकेट क्लब : ३५ षटकात ५ बाद १७४ (लावण्या शेट्टी ६४, सायली भालेराव ३९, अभिगील नाईक ४-२९-१, वैष्णवी पालन ७-४०-१, आर्या कानडे ४-३३-१, स्वरा दिवेकर ३-२२-१, अंजु सिंग ३-१०-१ ).